औरंगाबाद

कृषी पंपाचा विज पुरवठा सुरळीत करण्यासाठी शेकापचे रास्तारोको आंदोलन

विलास लाटे | पैठण : शेतकऱ्यांकडील कृषी पंपाची थकबाकी वसूल करण्यासाठी महावितरण शेतकऱ्यांचे विज कनेक्शन कट करीत आहे. हे तोडलेले कनेक्शन तात्काळ जोडून, सक्तीची वसुली थांबवून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने शेकापचे तालुका चिटणीस भाई चंद्रशेखर सरोदे, डाॅ.उमाकांत राठोड यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी (दि.२९) पैठण तालुक्यातील दावरवाडी फाट्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले.
अतिवृष्टीमुळे शेतकरी आधीच अडचणीत आले असतांना महावितरण कडून सक्तीची वसुली केली जात आहे. वीज तोडणी मुळे शेतकऱ्यांची रब्बीचे पिकं धोक्यात आली आहेत. त्यातच शासनाने पिक विमे थकविले. शेतकऱ्यांना अतिवृष्टीचे अनुदान आतापर्यंत मिळाले नाही. मालाला योग्य भाव मिळत नाही. शेतकऱ्यांनी खरीप हंगामात झालेले नुकसान रब्बीत भरुन काढु, या आशेने गहू, हरबरा, कांदा या पिकाची लागवड केली. ही पिके नुकतीच जमीनीतून बाहेर येत नाही ते महावितरणने वीज पुरवठा खंडित करुन थकीत बिले जमा करण्याचा घाट घातला. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरली आहे.
सरकार व महावितरणच्या या शेतकरी विरोधी धोरणाविरोधात शेतकरी कामगार पक्षाने आक्रमक भूमिका घेत तालुक्यातील दावरवाडी फाट्यावर रास्तारोको आंदोलन करण्यात आले. यावेळी महावितरणने कृषी पंपाची विज तोडणी तात्काळ थांबवावी, सक्तीची वसुली बंद करावी. पिक विमा व अतिवृष्टीचे अनुदान जमा करावे यामागणीसाठी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी महावितरण व तहसीलच्या अधिकाऱ्यांनी भेट देत, शेतकऱ्यांचे प्रश्न ऐकून घेत यासंदर्भात वरीष्ठांना कळवून लवकरच तोडगा काढु असे आश्वासन दिले. त्यामुळे रास्तारोको आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. शेतकर्‍यांचा वीज पुरवठा सुरळीत सुरु न झाल्यास आणखी तीव्र पध्दतीने आंदोलन करण्याचा इशारा शेकापच्या वतीने देण्यात आला. या आंदोलनास मा.आ. संजय वाघचौरे, राष्ट्रवादीचे नेते दत्ता गोर्डे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आप्पासाहेब निर्मळसह ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देऊन पाठींबा दर्शविला.
या आंदोलनात कॉ. भगवान भोजने, अन्सार शेख, किशोर नाडे, अशोक सरगर, प्रदीप ठोंबरे, दिपक हजारे, मिठुभाई मोदानी, पंडित राठोड, रावसाहेब चोरमले, अण्णा पाटील तांगडे, गणेश जगताप, मुस्तफा पठाण, भगवान सोरमारे, विकास जाधव, कैलास गुंजाळ, संजय सदावर्ते, माऊली काळे, परमेश्वर कपटी, किशोर वैद्य, देविदास सोनवणे, शुभम गायकवाड, बिलाल पठाण, नाथा सोरमारे, राजू वाघमोडे, प्रभाकर लोहगळे, शाम तांगडे, सोमनाथ दहिभातेसह आदी कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Related Articles

Back to top button