महाराष्ट्र

शासनाने तमाशा कलावंतांकडे सकारात्मक पाहावे – सौ. शांताबाई जाधव, दसऱ्याच्या मुहूर्तावर फडाचे उद्घाटन

बाळकृष्ण भोसले/ अहमदनगर : अटकेपार झेंडे लावलेल्या, महाराष्ट्राच्या मातीशी नात सांगणाऱ्या व राज्याची लोककलेची प्रामुख्याने पंढरी म्हणून ओळख सांगणाऱ्या ‘तमाशा’ या कलाप्रकाराची सुरुवात परंपरेप्रमाणे दरवर्षी दसऱ्यापासून होते. यंदा २२ ऑक्टोबर पासून सिनेमा नाट्यगृह खुले करण्याचे शासनाने जाहीर केले म्हणून तमाशा फडमालकांनी दसऱ्याच्या मुहूर्तावर आपले संगीत साहित्याची पुजा मांडत आगामी काळ यशदायी जाण्याची प्रार्थना केली. अहमदनगर जिल्ह्यातील संक्रापुर येथील सुप्रसिद्ध शाहीर संभाजी जाधव सह सौ. शांताबाई जाधव यांनीही तब्बल दोन वर्षानंतर आपल्या संगीत साहित्याची साग्रसंगीत पुजा मांडून तमाशाला चांगले दिवस येण्याची अपेक्षा आपल्या कुलदेवतेकडे व्यक्त केली आहे.


कोरोना महामारीच्या गत दोन वर्षाच्या प्रदिर्घ विश्रांतीनंतर सालाबादप्रमाणे महाराष्ट्राच्या लोककलेची विशाल परंपरा समजल्या जाणाऱ्या लोकनाट्य तमाशा मंडळाची ढोलकीवरची थाप आता गावागावातील जत्रा यात्रेतून रसिकांच्या कानावर पडणार असून विजयादशमी (दसरा) च्या मुहूर्तावर तमाशा फडमालकांनी आपल्या लोककलेच्या साहित्याची प्रथमच पुजा करुन आगामी २२ आक्टोबरच्या श्रीगणेशाची वाट पाहात आहेत. अखिल महाराष्ट्र तमाशा फडमालक महामंडळाचे माजी अध्यक्ष व अहमदनगर शाखेचे विद्यमान अध्यक्ष लोकशाहीर संभाजीराव जाधव सह सौ. शांताबाई जाधव संक्रापुरकर यांनी आपल्या संगीत साहित्याची पत्रकार बाळकृष्ण भोसले यांचे हस्ते पुजा करुन फडाचे उद्घाटन केले.

प्रसंगी त्यांनी तमाशा फडमालक, कलावंत व तमाशा कामगारांच्या समस्यांबाबत सांगोपांग चर्चा केली. कोरोनाचा काळ वगळता या तमाशा फडाचे दसऱ्याच्या मुहूर्तावर नारळ फोडून आपल्या महाराष्ट्र दौऱ्याला सुरुवात करतात. दसऱ्यानंतर तमाशाचा फडाला सुरुवात होवून आगामी ७ महिने अक्षयतृतीयेपर्यंत राज्यातील वेगवेगळ्या गावातील जत्रा यात्रेत हजेरी लावत आपल्या कलेचे प्रदर्शन करत असतात. मात्र कोरोना महामारीच्या काळात या लोककलावंतांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळली. काही कलावंतांवर तर उपासमारीची वेळ आली. बोटावर मोजण्याइतक्या तमाशा फडमालकांनी कसेबसे हे कलावंत उधार उसनवार करुन जगविले तर काही फडमालकच उध्वस्त झाल्याने त्याचे कलाकारही बेकार झाले. राजे रजवाड्यांच्या काळात राजाश्रय असलेली ही लोककला काळाच्या ओघात शासनकर्त्यांकडून उपेक्षित झाली असल्याचे शाहीर संभाजी जाधव उद्वेगाने सांगतात. दोन वर्षापासून या कलावंतांची अवस्था अक्षरशः भिकाऱ्यासारखीच झाली. शासनाने कोरोना काळात विविध समाजघटकांना आर्थिक पँकेज दिले. मात्र तमाशा कलावंतांकडे साफ दुर्लक्ष केल्याचे शांताबाई जाधव म्हणाल्या तर इतर काही जिल्ह्यातील तमाशा कलावंतांना तेथील स्थानिक लोकप्रतिनिधींनी आर्थिक मदत करत त्याच्या कुटुंबाला हातभार लावला. मात्र अहमदनगर जिल्ह्यातील एकाही लोकप्रतिनिधीने साधी फोनवरून विचारपूस केली नसल्याचे त्या म्हणाल्या.

शांताबाई पुढे बोलताना म्हणाल्या आमच्याकडे मोठ्या ८ गाड्या आहेत तर जवळपास ८० कलावंतांचा संच आहे. गत दोन वर्षापासून आम्ही या कलावंतांना सांभाळत आलो आहोत. शासन दरबारी वेळोवेळी पाठपुरावा केला परंतू आजपर्यंत कोणतीही मदत मिळाली नाही. आम्हा दोघा उभयतांसह तीन मुले संजय, सत्यजित व रविंद्र असे घरातील पाचजण ही लोककला समाजापुढे प्रदर्शित करुन जपत आलो आहोत. पण अशीच परिस्थिती राहिली तर आगामी काळात हि लोककला जिवंत राहील याची शाश्वती नसल्याचे त्या सांगतात. रसिकांच्या पुढे वेगवेगळे मुखवटे धारण करुन रसिकांचे मनोरंजन आम्ही करतो. परंतु आमची काय दु:ख आहेत ती आमच्या मनातच असतात. सात महिन्याच्या दौऱ्यात जी काय कमाई होते ती उर्वरित पाच महिने बसून खायला पुरत नाही. सध्याच्या मॉडर्न काळात अधुनिक रंगसंगती, नवनवीन संगीत साहित्य, वापरावी लागतात तरच रसिकांना ते भावते परंतु हा खर्च खूप असल्याने तमाशा फडमालकाची खूप परवड होते.

शासनाने आमच्या गाड्यांचा कोरोना काळातील दोन वर्षाचा तसेच चालू वर्षाच्या टँक्समधून पुर्णत: माफी द्यावी तसेच टोलमाफी करावी तरच दोन पैसे हाताला लागतील व उपजिविका चालेल बरोबर हि कलाही थोड्याफार प्रमाणात जिवंत राहील असे त्या म्हणतात. चित्रपटांना अव्वाच्या सव्वा सवलती देणारे शासन या ग्राऊंड झिरोवरील लोककलेकडे का दुर्लक्ष करतेय असा सवालही सौ. जाधव यांनी व्यक्त करत चित्रपटांच्या सवलतीपेक्षा आम्हा फडमालक व कलावंतांना पावहीस्सा जरी सवलत दिल्यास अजूनही रसिक प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविण्याची ताकद महाराष्ट्राच्या मातीशी नात सांगणाऱ्या आम्हा तमाशा कलावंतांमध्ये असल्याचे शांताबाई जाधव आत्मविश्वासाने शेवटी म्हणाल्या.

Related Articles

Back to top button