औरंगाबाद

शासकीय गोदामात हजारो क्विंटल धान्याचे पिठ….!

पाचोड येथील गोदामपाल साठ्याबाबत अनभिज्ञ

विजय चिडे/पाचोड : केंद्र व राज्य सरकारने अन्न धान्य गोरगरिबांना मिळावे व सामान्य नागरिकांची उपासमार होऊ नये या उदात्त हेतूने सामान्य नागरिकांसाठी स्वस्त धान्य दुकाने सुरू करून सामान्य नागरिकाला रास्त किमतीमध्ये अन्नधान्य मिळावे यासाठी रास्त धान्य योजना सुरू केली. परंतु पाचोड येथे हे धान्य गोरगरिबांच्या घशात न जाता सोनकिडे, अळ्याच्या घशात जाऊन पिठ तयार होत आहे. त्यामुळे या धान्याची नासाडी होत असून या योजनेला हरताळ फासला जात आहे. तालुका पुरवठा अधिकारी व गोदाम व्यवस्थापकाच्या वेळकाढू व स्वार्थवृत्तीमुळे गोरगरीब धान्यापासून वंचित राहत आहे.

पाचोडसह पंचक्रोशीतील मुरमा, कोळीबोडखा, लिमगांव, थेरगाव ,वडजी, दादेगाव, अंतरवाली, आडगाव, दाभरूळ, कडेठाण, रांजणगाव सह परिसरातील रास्तधान्य दुकानात धान्य जलद गतीने पोहोचावे व या धान्याचा उपयोग गोरगरिबांना व्हावा यासाठी पाचोड येथे धान्याचे शासकीय गोदाम उभारण्यात आले. परंतु पाचोड गोडवून किपर बेफिकीर असून येथील सर्व जबाबदारी हमालवर्गावर सोपवून तो केवळ हित जोपासण्यावर भर देत आहे.

लाॅकडाउनने हातावर पोट असणाऱ्या नागरीकांचा पोटापाण्याचा व रोजगाराचा प्रश्न निर्माण होऊन त्यांची उपासमार होत आहे. केंद्र सरकारने प्रत्येक कुटुंबाला तीन महिने मोफत पाच किलो तांदूळ व एक किलो तुरदाळ देण्याचे जाहीर केले. मात्र येथे हजारो क्विंटल तांदूळ, गहू धूळखात पडून त्याचे पिठ होत आहे. गोदामात नेमकी धान्याची आकडेवारी स्टॉक या गोडावून किपरला माहित नाही. पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत पैठण तालुक्यातील अनेक कुटुंबांना मोफत तांदूळ मिळाल्याचा मोठा आधार मिळाला असल्याचा केवळ गाजावाजा केला जात आहे. गहू व तांदूळ सर्वांना मिळालेला नाही. एवढेच येथे येणाऱ्या साखरेला परस्परच काळाबाजार दाखविला जातो.

एखाद्या लाभार्थ्यांला साखर मिळाल्याचे स्मरणात नाही. मोफत डाळ वाटप करण्यात आलेली नाही. त्यामुळे मोफतचा तांदूळ आणि डाळ कुठे आहे हा प्रश्नही नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. या काळात पंतप्रधान योजने अतंर्गत पैठण तालुक्यातील अनेक शिधापत्रिका धारकांना तांदूळ व डाळ देण्यात आला नाही. ज्यांना शिधापत्रिका नाहीत अशा कुंटुंबासह केसरी कार्ड धारकांना कधीच मोफत दिली नाही. गोडावून किपर, तालुका पुरवठा अधिकारी तथा नायब तहसिलदार यांचे साटेलोटे असुन गोडावुन मध्ये सरकारी अधिकाऱ्यापेक्षा खासगी लोकांची चलती व उठबैस आहे. हजारो क्विंटल धान्य गोदामात पडून त्याचे पिठ, नासाडी होत असताना नवीन धान्याची होणारी आयात काळ्या बाजाराला खतपाणी घालणारी ठरत आहे. यासंदर्भात पैठणचे पुरवठा अधिकाऱ्यांना दुरध्वानीव्दारे संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही.

Krantinama Team

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक,क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button