साहित्य व संस्कृती

डॉ.वंदना मुरकुटे यांनी डॉ. उपाध्ये यांच्यावरील “साहित्यशिल्प” गौरवग्रन्थ काढून त्यांना खरी गुरुदक्षिणा दिली : विश्वासराव पाटील

श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) : डॉ.सौ वंदना ज्ञानेश्वर मुरकुटे, डॉ.शिवाजी काळे, डॉ. रामकृष्ण जगताप यांनी संपादित केलेल्या सेवानिवृत्त प्रा.डॉ.बाबुराव उपाध्ये यांच्यावर आधारित “साहित्यशिल्प ” गौरव ग्रंथाचे प्रकाशन माझ्या हस्ते झाले, हा विशेष आनंद आहे. आपल्या गुरूवर गौरव ग्रंथ काढून संपादक विद्यार्थ्यांनी डॉ. उपाध्ये यांना खरी गुरुदक्षिणा दिली असल्याचे मत मराठी साहित्यातील मान्यवर लेखक “पानिपत” या लोकप्रिय कादंबरीचे लेखक आणि सेवानिवृत्त कलेक्टर श्री विश्वासराव पाटील यांनी व्यक्त केले.

संगमनेर येथील महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य संतोष खेडलेकर यांनी आयोजित केलेल्या ‘लेखक विश्वासराव पाटील ग्रेट भेट आणि साहित्य चर्चा ‘कार्यक्रमात ‘साहित्यशिल्प ‘ चे प्रकाशन केल्यानंतर विश्वासराव पाटील बोलत होते. संतोष खेडलेकर यांनी स्वागत, प्रास्ताविक केले. डॉ. वंदना मुरकुटे, डॉ.बाबुराव उपाध्ये यांचा परिचय करून दिला. यावेळी देविदास गोरे, सौ.प्रभावती खेडलेकर, सौ. वैशाली खेडलेकर, देविदास गोरे, सौ. पुष्पाताई गोरे, स्वनिल कोल्हे, ज्ञानेश्वर केदार आदी उपस्थित होते. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी अनेक ग्रन्थभेट देऊन विश्वासराव पाटील यांचा सत्कार केला तर डॉ.सौ. वंदना मुरकुटे यांनी छत्रपती शिवराय यांची प्रतिमा आणि योगीराज गंगागिरी महाराज ते सद्गुरू नारायणगिरी महाराज “या सरला बेटावर आधारित पुस्तक देऊन सत्कार केला.

संतोष खेडलेकर यांची महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळावर सदस्यपदी निवड झाल्याबद्दल डॉ.सौ. मुरकुटे आणि डॉ. उपाध्ये यांनी सत्कार केला. विश्वासराव पाटील यांनी संतोष खेडलेकर यांच्या मातोश्री सौ. प्रभावती खेडलेकर यांचा सत्कार केला. डॉ.वंदना मुरकुटे आणि डॉ.उपाध्ये यांच्या पुस्तकावर आपण सविस्तर लिहिणार असल्याचे सांगून पेमगिरी डोंगर भागातील केलेल्या पाहणीची आणि शिवराय यांच्यावर लेखनचर्चा केली.”फकिरा”कार अण्णा भाऊ साठे यांच्या साहित्याचा, व्यक्तिमत्वाचा आढावा घेतला.

श्रीरामपूर भागातील साहित्य, राजकारण, सहकार आदी विषयावर चर्चा झाली. पेमगिरीचा शिवराय काळातील इतिहास सांगून या संदर्भाने शोध घेत असल्याचे पाटील यांनी सांगितले. डॉ.उपाध्ये यांनी आपल्या “फिरत्या चाकावरती ” या आत्मकथनाची सविस्तर माहिती दिली. डॉ.मुरकुटे यांनी सरला बेट आणि ग्रंथनिर्मिती, विक्रीतील उच्चांक, मालेगाव, श्रीरामपूर, शिक्षणकार्य यासंदर्भात चर्चा करून विश्वासराव पाटील यांच्या भेटीमुळे झालेला आनंद व्यक्त केला. संतोष खेडलेकर यांनी मनोगत व्यक्त करीत आभार मानले.

Related Articles

Back to top button