धार्मिक

पवित्र मारिया नितीमत्वासाठी छळ सहन करणाऱ्याची सहाय्यकारिणी- फा. आनंद बोधक

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : हरेगाव येथील मतमाउली भक्तीस्थानात अमृत महोत्सवी यात्रापूर्व पाचव्या नोव्हेनाप्रसंगी फा. आनंद बोधक यांनी “पवित्र मारिया नितीमत्वासाठी छळ सहन करणाऱ्यांची सहाय्यकारिणी” या विषयावर पाचवे पुष्प गुंफताना प्रतिपादन केले की आज आपण मतमाउलीचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी एकत्र आलो आहोत. या विषयावर मनन चिंतन करीत असताना विशेष प्रकारे पवित्र मरिया आम्हा प्रत्येकाची आई आहे.

प्रभू येशू ख्रिस्त लाकडी वधस्तंभावर मरण पावला. तेंव्हा त्याने अखंड जगासाठी मानवजातीसाठी आपली माता दिली व तिचे मातृत्व आम्हा प्रत्येकासाठी दिले. ज्या व्दारे आमच्या सुखदुःखात, अडचणीत तिच्या चरणाशी जातो. आपल्या इच्छा आकांक्षा, मनोकामना तिच्या चरणी मांडतो व ज्या ज्या वेळेस आम्हाला प्रत्येकाला धर्म पाळण्यासाठी देवाची स्तुती, आराधना करण्यासाठी व नितीमत्वाचे जीवन जगण्यासाठी ती आम्हाला सहाय्य करीत असते.

ख्रिस्ताच्या मार्गावर चालण्यासाठी ख्रिस्त हा आमचा एकमेव परमेश्वर आहे. ज्याच्याव्दारे आमचे प्रत्येकाचे तारण आहे. त्याच्या पाऊल खुणावर चालण्यासाठी आपल्याला प्रेरित करीत असते. जेंव्हा आपण एक धर्म, एक तत्व पाळतो, ते पाळत असताना आपल्याला विरोध होत असतो. ती त्या विरोधाला, छळाला सामोरे जाण्यासाठी पवित्र मारिया प्रत्येकाला बळ देते, शक्ती, सामर्थ्य पुरविते व परमेश्वराकडे एकमेव मध्यस्थी करते. तिने केलेली मध्यस्थी प्रभू येशू कधीच नाकारीत नाही, आनंदाने स्वीकारतो व प्रत्येकाला संरक्षण देतो.

आज तिच्या चरणाशी नतमस्तक होत असताना तिच्या मध्यस्थीने परमेश्वराकडे आशीर्वाद मागू या. ज्याद्वारे आपण प्रत्येक जण या पृथ्वीतलावर नितीमत्वाचे जीवन जगू या. देवाला स्मरून जीवन जगू, त्याच्या आज्ञा पाळून त्याच्या मार्गावर चालू या. आमच्या जगण्याव्दारे ख्रिस्त गाजवण्यासाठी आम्हा प्रत्येक या पवित्र मातेचे सामर्थ्य लाभत असते, बळ मिळते. अत्याचाराला सामोरे जाण्यासाठी आणि देवाचा याद्वारे गौरव करण्यासाठी, आपल्या मनोकामना दुख आजार तिच्या चरणाशी मांडू या. देवाचा आशीर्वाद मिळवून पृथ्वीतलावर श्रद्धा ठेवण्यासाठी पुरेपूर व परिपूर्ण जीवन जगण्यासाठी तिचा आशीर्वाद मागू या.

या नोव्हेना प्रसंगी हरेगाव प्रमुख धर्मगुरू डॉमनिक रोझारिओ, सचिन, रिचर्ड, संजय पंडित आदी सहभागी होते. दि ५ सप्टेंबर रोजी शिक्षक दिन असल्याने सर्व शिक्षकांचा मानसन्मान नोव्हेना प्रसंगी करण्यात येणार असल्याचे प्रमुख धर्मगुरू फा. डॉमनिक रोझारिओ यांनी सांगितले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button