शिक्षणवारी ज्ञान पंढरी

विद्यार्थ्यांनो आयुष्यात सर्वगुणसंपन्न बना-डॉ. अमोल जत्राटकर

राहुरी विद्यापीठ : डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या स्वप्नातील भारत निर्माण करण्याची जबाबदारी विद्यार्थ्यांवर आहे. त्यासाठी त्यांनी विज्ञाननिष्ठा व कष्ट करण्याची तयारी ठेवावी. विद्यार्थ्यांनी आपल्या आवडत्या भाषेतील पुस्तके भरपूर वाचावीत तसेच इतर भाषेचा मत्सर करणे टाळावे. इतर भाषांच्या विकासातूनच आपली भाषा समृद्ध होते. विद्यार्थ्यांनी सोशल मीडियाचा वापर विचारपूर्वक करावा व कोणत्याही गोष्टीचा अतिरेक टाळावा. सतत वाचन केल्यानंतर लेखनाची प्रेरणा मिळते. सतत कष्ट करा तुम्हाला यश नक्की मिळेल. स्वतःच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास करून आयुष्यात सर्वगुणसंपन्न नागरिक बना असे प्रतिपादन कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी डॉ. अमोल जत्राटकर यांनी केले.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषी महाविद्यालय, हळगाव या महाविद्यालयात भारतरत्न डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहिरे यांच्या शुभहस्ते भारतरत्न डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. महाविद्यालयाचे सर्व शिक्षक वर्गीय कर्मचारी तसेच शिक्षकेतर कर्मचारी या कार्यक्रमाला उपस्थित होते. या कार्यक्रमानंतर सर्व विद्यार्थ्यांबरोबर ऑनलाइन पद्धतीने वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन करताना डॉ. अमोल जत्राटकर बोलत होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. अहिरे म्हणाले की , आपण वाचन केले तर आपले विचार प्रगल्भ होतील. विद्यार्थ्यांनी एका आठवड्यात एक पुस्तक नक्की वाचावे ज्यामुळे जीवन घडण्यामध्ये त्याचा विद्यार्थ्यांना नक्की उपयोग होईल. यावेळी त्यांनी महाराष्ट्रामधील पुस्तकांचे गाव भिलार वाडी या विषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली.


यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक महेश जाधव, मंजिरी पाटील व संस्कृती सनस या विद्यार्थ्यांनी डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या विषयीचे आपले विचार मांडले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व प्रमुख पाहुण्यांची ओळख प्रा. कीर्ती भांगरे यांनी करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महाविद्यालयाचे विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. सखेचंद अनारसे यांनी केले. या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉ. चारुदत्त चौधरी, डॉ. प्रेरणा भोसले, डॉ. मनोज गुड, कृषी सहाय्यक श्री. अमृता सोनवणे, सौ. वैशाली पोंदे, सौ. अंजली देशपांडे, सौ. ज्योती सासवडे उपस्थित होते.

Related Articles

Back to top button