औरंगाबाद

विजाभज यांनी पदोन्नतीतील आरक्षण गमावणे, म्हणजे स्वाभिमान संपविणे होय- तात्याराव चव्हाण

 
विलास लाटे/पैठण : आरक्षण म्हणजे आपली अस्मिता, ओळख, स्वाभिमान आहे. तेच सरकार संपवत आहे. शासनाला मराठा आरक्षण देता येत नसल्याने त्यांचा दबाव कमी करण्यासाठी इतरांचे आरक्षण संपविण्याचे धोरण अवलंबिले असल्याचे दिसून येत आहे. विजाभज प्रवर्गातील लोकांनी जर हे पदोन्नतीतील आरक्षण गमाविणे म्हणजे आपला स्वाभिमान गमाविणे होय. असे मत ‘क्रांतीनामाशी’ बोलताना वसंतराव नाईक प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा तांडा सुधार समितीचे जिल्हाध्यक्ष तात्याराव चव्हाण यांनी व्यक्त केले आहे.

महाराष्ट्र शासनाने नुकतेच भटक्या विमुक्तांच्या पदोन्नतीतील आरक्षण काढून घेण्यासाठी कोर्टात शपथपत्र दाखल केले आहे. ते आरक्षण वाचविण्यासाठी सकल गोरबंजारा समाजासह विजाभज अबकड या सर्व लोकांनी अंतीम श्वासापर्यंत लढा द्यायला हवा. कारण राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे, जातीवादी सरकार असल्याचे आता सिध्द होत आहे. त्यांच्या बोलण्यात आणि करण्यात फार मोठा फरक दिसुन येत आहे. ज्या विमुक्त भटक्यांना हे सरकार आदिवासींपेक्षा जास्त मागासलेला प्रवर्गातील असल्याचे समजत होते, तेच सरकार आज विजाभज- अबकड यांना मिळत असलेले पदोन्नतीतील आरक्षण काढण्यासाठी उच्च न्यायालयात शपथपत्र दाखल केलेले आहे. दावा दाखल करणारे राज्य सरकारच आहे म्हणून सदर आरक्षण जाणार म्हणजे जाणार.

परंतु भटक्या विमुक्त जातीच्या अबकड प्रवर्गातील सर्व लोकांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. आणि उज्वल निकम सारखा चांगला अधिवक्ता नेमणुक केली तर निर्णय कदाचित विमुक्त भटक्यांच्या बाजूने देखील लागू शकतो. परंतु त्यासाठी सर्वांनी तन, मन, धनाने सहकार्य करणे आवश्यक आहे. 

“बुँदसे जो गई तो, हौदसे फिरसे ना आये” अशी खूणगाठ मनात बांधून सर्वांनी एकत्र येवून सशक्त लढा देण्याची गरज आहे. हे आरक्षण बंद झाल्यास विमुक्त भटक्या प्रवर्गातील जे अधिकारी पदोन्नतीमुळे वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत, त्यांना त्यांच्या मुळ पदावर येऊ शकतात. त्यामुळे आरक्षणाअभावी रिक्त झालेल्या विमुक्त भटक्यांच्या पदावर दुस-या प्रवर्गातील अधिकारी बसतील आणि त्यांच्याकडून मानसिक त्रास होण्याची दाट शक्यता नाकारता येत नाही. संबंधितास “अपमान से मरना भला.” शिवाय मानसिक खच्चीकरण वेगळेच!  विमुक्त भटक्यांच्या हक्कांवर गदा येणे म्हणजे सामाजिक स्वातंत्र्य हिरावणे होय. म्हणून हे आरक्षण वाचविण्यासाठी जितके प्रयत्न करता येईल तेवढे करावे. या लढाईत विमुक्त भटक्यांचा पराभव झाला तर कदाचित पुढे चालून विमुक्त भटक्या जाती जमातीला नोकरी व शिक्षण यात मिळणारे आरक्षण सुद्धा सरकार काढून घेऊ शकते. ही पहिली पायरी आहे.  म्हणून कोणत्याही परिस्थितीत हे आरक्षण वाचविणे अत्यंत जरुरीचे होऊन बसले आहे.

सदरील लढा आपल्या सहभागाशिवाय होऊच शकत नाही, असे समजून प्रवर्गातील प्रत्येकाने आपल्या परीने आवश्य सहभाग घ्यावा. ज्यांना प्रत्यक्ष सहभाग घेता येत नाही, त्यांनी आर्थिक, बौद्धिक सहभाग द्यावा. ज्यांची परिस्थिती चांगली आहे, त्यांनी या लढ्यासाठी भरीव मदत करावी. ज्यांना ज्यांना अधिक वेळ, संघटन कौशल्य देता येईल, त्यांनी ते द्यावा. सदर लढा यशस्वी करावा. समाजातील प्रत्येकाने आपल्या परीने खारीचा वाटा उचलावा. असे आवाहन तात्याराव चव्हाण यांनी केले आहे.

Krantinama Team

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक,क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button