अहमदनगर
वळण शाळेतील रिक्त शिक्षकांची पदे तात्काळ भरा,अन्यथा बालदिनी उपोषणाचा इशारा
राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी/जावेद शेख : राहुरी तालुक्यातील वळण येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापकांसह रिक्त असलेल्या शिक्षकांची तात्काळ नेमणुक न झाल्यास “बालदिनी” आमरण उपोषण छेडले जाईल, असा इशारा शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने देण्यात आला आहे.
गटशिक्षणाधिकारी सुर्यवंशी यांना याबाबतचे निवेदन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गोविंद फुणगे, सरपंच सुरेश मकासरे, उपसरपंच एकनाथ खुळे, बाळासाहेब खुळे, अशोक कुलट, उमेश खिलारी, रवींद्र गोसावी, देवानंद मकासरे यांनी दिले आहे. सदर निवेदनात म्हटले आहे की, वळण(ता.राहुरी) जिल्हा परिषद सेमी इंग्रजी शाळेत इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत वर्ग असून सुमारे तीनशे विद्यार्थी शिक्षण घेत आहे. या शाळेत गेल्या दोन वर्षापासून पदे रिक्त आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असून शैक्षणिक दर्जा देखील खालवण्याची संभावना आहे.
या शाळेला शंभर वर्षे पूर्ण झाली असून शाळेचे सुवर्णमहोत्सवी वर्ष सुरू असताना देखील या गंभीर परिस्थितीचा सामना विद्यार्थ्यांना करावा लागत आहे. त्यामुळे या समस्येकडे शिक्षण विभागाने तात्काळ लक्ष देऊन रिक्त असलेल्या शिक्षकांची पदे भरावीत अन्यथा शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांसह पालक १४ नोव्हेंबर या बालदिनी गट शिक्षण अधिकारी यांच्या दारासमोर उपोषण छेडले जाईल. या निवेदनाच्या प्रती शिक्षणमंञी वर्षाताई गायकवाड, उच्च व तंत्र शिक्षण राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा शिक्षणाधिकारी पाटील, तहसीलदार, पोलिस निरीक्षक यांना माहीतीस्तव पाठविण्यात आली आहे.