अहमदनगर

लालपरीचे चाक ठप्प झाल्याने प्रवाशांचे हाल; एसटी कर्मचार्यांच्या मागण्या मान्य करण्याची प्रवाशांची मागणी

राहुरी/ श्रीरामपूर : राज्य परिवहन महामंडळाचे महाराष्ट्र शासनात विलीनीकरण व्हावे आणि कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, वेतनश्रेणी मिळावी या प्रमुख मागणी साठी राज्यभरातील एसटी कर्मचार्यांच्या कामबंद आंदोलनामुळे बहुतांशी सामान्यांच्या लालपरीचे चाक ऐन दिवाळीत ठप्प झाले. या कामबंद आंदोलनाचे मोठे पडसाद जिल्ह्यात दिसून येत आहेत. लालपरीमुळे शाळा, नोकरी, दिवाळी सणासाठी येणेंजाणे आदिबाबत गैरसोय निर्माण झाली आहे. ७ नोव्हेंबरपासून तारकपूर या प्रमुख आगारासह जिल्ह्यातील सहा आगारात कामबंद आंदोलन सुरू झाले आहे.

२८ ऑक्टोबर रोजी संयुक्त कृती समिती आणि प्रशासनात बोलणी होत प्रलंबित देणी, महागाई भत्ता वाढ, घरभाडे भत्ता वाढ या मागण्या मान्य करण्यात आल्या असल्या तरी एसटी महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण ही प्रमुख मागणीवर विचार करण्यात आलेला नाही. यातून शेवगाव आगारातील चालक काकडे यांनी एसटी बसच्या मागील बाजूस शिडीला लटकून आत्महत्या केली. त्यामुळे शहीद दिलीपराव काकडे यांचे बलिदान व्यर्थ जाऊ न देण्यासाठी शेवगाव आगारातील सर्व कर्मचार्यांनी हे दि. ७ नोव्हेंबर पासून रात्री १२ वाजल्यापासून कामबंद आंदोलन सुरु केले आहे.
जिल्ह्यातील सहा एसटी आगारातील वाहक आणि चालक यांचं काम बंद आंदोलन सुरू झाल्याने या आगारातून एकही बस इतर ठिकाणी जाऊ शकलेली नाही. त्यामुळे ऐन दिवाळीत प्रवाशांचे हाल होताना दिसून येत आहे. मात्र जोपर्यंत शासनाच्यावतीने एसटी महामंडळाचे सरकारमध्ये विलीनीकरण होत नाही तोपर्यंत जिल्ह्यातील सर्व आगारांमध्ये वाहक आणि चालक सेवेत रुजू राहणार नसून आगारांमध्ये कर्मचारी आंदोलन करणार असल्याचं सांगण्यात आले आहे. वाहक आणि चालक यांनी आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला असून शासन किंवा न्यायालय कोणताही निर्णय घेऊ किंवा कोणतीही कारवाई करू मात्र जो पर्यंत विलीनीकरण करण्याचा निर्णय शासन घेत नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन कायम राहील असं ठणकावून यावेळी सांगण्यात आले.
श्रीरामपूर आगारातून ४८ बसेस बाहेर पडल्या नाहीत. सणामध्ये दीपावलीच्या भावबीज झालेली असताना अनेक प्रवासी यांची संख्या वाढते. कामबंद असलेल्या एसटी स्टॅन्ड वर प्रवाशांची गर्दी दिसून येत आहे. नजीकच्या काळात विविध एसटी संघटनांनी आंदोलन एककिडे तीव्र केलेले असताना दुसरीकडे कर्मचाऱ्यांच्या- तुपुंजे वेतन, मूलभूत गरजा भागवता येत नसल्याने झालेले कर्ज, मुलांचे शिक्षण, लग्न कार्य यात हतबलता असल्याने नैराश्यातून आतापर्यंत ३६ एसटी कर्मचाऱ्यांनी वाहक- चालक आत्महत्या केल्या असून यामुळे परिवहन मंत्री यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी संघटनांची मागणी आहे. ९ नोव्हेंबर पासून खाजगी वाहतूकीस परवानगी दिल्यामुळे व एसटी बंद असल्याने खाजगी बसेस, रिक्षा, टॅक्सी यांनी गैरफायदा घेऊन अव्वाच्या सव्वा प्रवास भाडे आकारले जात आहे. नागरिकांची लूट होत आहे. त्यामुळे प्रवाशांनी शासनाने लवकरात लवकर एसटी कर्मचार्यांच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी केली आहे.

Related Articles

Back to top button