कृषी
रोपवाटीकेतून स्वावलंबनाची यशस्वी वाटचाल
कृषि कन्या कु. अपुर्वा गोकुळ वामन या विद्यार्थीनीने धामोरी ता. राहुरी येथील रोपवाटीका चालक अशोक लक्ष्मण उंडे यांची भेट घेऊन तयार केलेली यशोगाथा
राहुरी प्रतिनिधी : तालुक्यातील धामोरी येथील उंडे या शेतकर्याने 2008 मध्ये केवळ 25 हजारांची गुंतवणूक करीत रोपवाटिका व्यवसायात पाऊल ठेवले. अतीव कष्ट, चाौफेर अभ्यास, बाजारपेठ, सध्याची गरज तसेच उद्यानविद्या विभागातील तंत्रज्ञान आदींच्या बळावर सुरुवातीच्या 25 हजारांची गुतवणूक आज जवळपास 15 लाखांपर्यत गेली. हा व्यवसाय सुरुवात करु पाहणार्या तरुणांना, शेतकर्यांना हे निश्चितच दिशादर्शक आहे. अहमदनगर जिल्ह्यातील धामोरी येथील अशोक लक्ष्मण उंडे हे आज रोपवाटिका व्यवसायात यशस्वी आत्मविश्वासपूर्वक वाटचाल करत आहे. सुरुवातीला 2 वर्षे भाडोत्री तत्वावर जमीन घेऊन रोपवाटिका व्यवसाय सुरु केला. वडील लक्ष्मण संभाजी उंडे हे कृषि विद्यापीठात कार्यरत होते. त्यांच्याच प्रेरणेने त्यांनी या व्यवसायाला सुरुवात केली. उंडे यांनी माळी पदविका अभ्यासक्रम पूर्ण केला. त्यानंतर रोपवाटिकेविषयी असणारी आवड व वडिलांकडून मिळालेली प्रेरणा या बळावर त्यांनी या व्यवसायात पाऊल ठेवले.
सुरुवातीला 2 वर्षे भाडोत्री तत्वावर जमीन घेऊन सुरुवात केलेला त्यांचा प्रवास आज स्वत:च्या मालकी असलेल्या आठ एकर क्षेत्रापर्यत येऊन पोहोचला आहे. या आठ एकर क्षेत्रावर विविध फळझाडांच्या मातृवृक्षांची लागवड व रोपवाटिकेचा (शेडनेट -2 एकर, पॉलीहाऊस -15 आर) परिसर आहे. या रोपवाटिकेतून आंबा, आवळा, चिकू, पेरु, सीताफळ, जांभूळ, डाळींब, अंजीर, चिंच, लिंबू, संत्री अशी अनेक प्रकारीच फळरोपे तसेच अनेक झाडे व फुलांच्या वनस्पती येथे उपलब्ध होतात. अशोक उंडे व त्यांच्या कुटूंंबातील सर्व सहा व्यक्तीे पूर्णपणे रोपवाटिकेची कामे करतात. तसेच या रोपवाटिकेतून जवळपास 30 जणांना रोजगार उपलब्ध होतो.दोन वर्षांपूर्वी वारा व गारांचा पाऊस या नैसर्गिक आपत्तीमुळे अशोक उंडे यांना आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले. त्यात यांचे प्रचंड नुकसान झाले. परंतु या सर्वांवर मात करत उंडे पाटील यांनी आपलेे यशस्वी वाटचाल चालू ठेवली.
माळीविद्या या विषयात पदविका अभ्यासक्रम करणारे अशोक उंडे यांना प्रगतशील शेतकरी पुरस्कार (2016), तसेच लोकसत्ता संघर्ष तर्फे कृषिरत्न पुरस्कार (2019) याने गौरविण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र राज्य नर्सरी असोसिएशन चे संचालक पद देखील त्यांनी भूषविलेले आहे. रोपवाटिकेला भेट देणारे शेतकरी, अधिकारी तसेच नर्सरीमध्ये रोज काम करणारे कामगार यांना आदराने वागविणारे अशोक उंडे पाटील हे माणुसकीचा जिवंत झरा आहेत. उंडे यांचा आदर्श समोर ठेवून इतर शेतकरी व विशेषत: तरुणांनी रोपवाटिकेकडे एक व्यवयास म्हणून पाहण्याची गरज आहे. कलम केलेल्या रोपांची वाढती मागणी लक्षात घेऊन त्यानुसार नियोजन व कृती करण्याची गरज आहे. तसेच या व्यवसायात रोजगार निमिर्तीची मोठी क्षमता असल्याने एक यशस्वी उद्योजक होेण्यासाठी हे अनुरुप क्षेत्र आहे.