पश्चिम महाराष्ट्र

श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे आमदार निधीतून पाडेगाव ऊस संशोधन केंद्राकडे जाणार्या रस्त्याचे डांबरीकरणास शुभारंभ

राहुरी शहर/ अशोक मंडलिक : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत असलेल्या मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव हे उसाचे मुख्य संशोधन केंद्र आहे. या केंद्राला 90 वर्ष पूर्ण होत आहेत. उसाचे अधिक ऊस आणि साखर उत्पादन देणारे नविन वाण विकसीत करणे हा या केंद्राचा मुख्य उद्देश आहे.
या केंद्राने स्थापनेपासून आतापर्यंत उसाचे 14 नविन वाण आणि तंत्रज्ञानाच्या 102 शिफारशी दिल्या आहेत. या केंद्राचा देशभर नावलौकिक असून संपूर्ण राज्यासह शेजारच्या राज्यांमध्येही उसबेणेचा पुरवठा येथून होतो. या संशोधन केंद्रास आंतरराष्ट्रीय शास्त्रज्ञ, राज्यातील साखर कारखान्यांचे चेअरमन, संचालक, अधिकारी आणि शेतकरी भेटी देत असतात. अशा या महत्वपूर्ण संशोधन केंद्राकडे येण्यासाठी नीरा – लोणंद मार्गावरुन रस्ता असून दोन तालुक्यांच्या सिमेवरचा रस्ता असल्याने कायम दुर्लक्षित रहात होता. सदरचा रस्ता अत्यंत खराब झाला असून दरवर्षी पावसाळ्यात नीरा नदिच्या पाण्यामुळे संशोधन केंद्राकडे येण्यासाठी अधिकारी, शेतकरी तसेच पाडेगाव ग्रामस्थांना अत्यंत कसरत करावी लागत होती.
पाडेगाव संशोधन केंद्राने शिफारस केलेल्या उसाच्या को-86032 वाणाची गौरवशाली 25 वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्ताने को-86032 वाणाचा रौप्य महोत्सव आणि संशोधन केंद्राचा नऊ दशकपूर्ती महोत्सव लवकरच साजरा करण्यात येत आहे. या संशोधन केंद्राकडे येणार्या सदरच्या रस्त्याच्या डांबरीकरणासाठी महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांनी विशेष लक्ष घालून त्यांनी विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचेशी चर्चा केली.
त्याचप्रमाणे विद्यापीठाचे संशोधन संचालक डॉ. शरद गडाख यांनी सुध्दा रस्त्याच्या संदर्भात मार्गदर्शन केले. या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली पाडेगाव ऊस संशोधन केंद्राचे ऊस विशेषज्ञ डॉ. भरत रासकर, केंद्राचे शास्त्रज्ञ डॉ. रणजित निंबाळकर, डॉ. किरणकुमार ओंबासे आणि पाडेगावच्या सरपंच सौ. स्मिता खरात या सर्वांनी ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांना निवेदन दिले. त्यांनी या कामात विशेष लक्ष घातल्यामुळे सदरच्या रस्त्याचे डांबरीकरणाचे आणि नविन पुलाचे काम सुरु होत आहे. या केंद्राला भेट देण्यासाठी व ऊस बेणे घेण्यासाठी येणार्या शेतकरी तसेच पाडेगाव ग्रामस्थांचा मार्ग सुकर होत असल्यामुळे कुलगुरुंनी तसेच ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे पाडेगाव ऊस संशोधन केंद्राला सातत्याने मार्गदर्शन लाभत असून हा रस्ता करण्याचे त्यांचेही स्वप्न होते ते आता प्रत्यक्षात साकार होत आहे. या रस्त्याच्या डांबरीकरण कामाच्या शुभारंभापूर्वी कुलगुरु यांच्या वतीने सभापतींचे आभार मानण्यात आले.

Related Articles

Back to top button