ठळक बातम्या

राहुरी तालुक्यातील विकास कामांना स्थगिती देणार्या सरकारचा सायकल रॅलीने निषेध

राहुरी शहर | अशोक मंडलिक : शिंदे-फडणवीस शासनाने बुलेट ट्रेनसाठी ग्रामिण भागातील शेतकर्‍यांचे व ग्रामस्थांचे रस्ते हिरावून घेतले. धनदांडग्याच्या हितासाठी सर्वसामान्य व शेतकर्‍यांच्या वाटोळ्यावर निघालेल्या राज्य शासनाला घेरण्यासाठी राष्ट्रवादी पक्ष उभा आहे. माझ्या मतदार संघातील शेतकर्‍यांच्या व ग्रामस्थांसाठी मंजूर झालेला निधीला स्थगिती देणार्‍या शासनाला वठणीवर आणूच असा ठाम विश्वास आमदार प्राजक्त तनपुरे यांनी व्यक्त केला.
राहुरी येथून सायकलीसह हजर झालेल्या शेकडो कार्यकर्त्यांसमवेत आ. तनपुरे यांच्या सायकल रॅलीचा प्रारंभ झाला. बारागाव नांदूर गावामध्ये आगमन झालेल्या सायकल रॅलीचे ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त स्वागत झाले. कार्यकर्त्यांनी पन्नास खोके, एकदम ओके… स्थगिती सरकारचे करायचे काय, खाली मुंडके वर पाय अशा निषेधार्थ घोषणा दिल्या.
याप्रसंगी आ. तनपुरे यांच्यासह जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, जि.प.सदस्य धनराज गाडे, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रभाकर गाडे, नगरसेवक नंदकुमार तनपुरे, सुर्यकांत भुजाडी, प्रकाश भुजाडी, सरपंच चंद्रकांत पानसंबळ, इंद्रभान पेरणे, बाळासाहेब खुळे, सचिन भिंगारदे, रविंद्र आढाव, किसन जवरे, भारत तारडे, सलीम शेख,नवाज देशमुख, सेवा संस्थेचे अध्यक्ष विश्वास पवार, किशोर कोहकडे, सरपंच निवृत्ती देशमुख, डॉ. ज्ञानेश्वर आघाव, सरपंच रामदास बाचकर, ज्ञानेश्वर आघाव, श्रीराम गाडे, वसंतराव गाडे, श्रीकांत बाचकर आदींसह बारागाव नांदूर, मल्हारवाडी, घोरपडवाडी गावातील ग्रामपंचायत व सेवा संस्थेचे सर्व पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
बारागाव नांदूर, मल्हारवाडी व ढोकरवाडी असा प्रवास करीत सायकल रॅलीने राज्य शासनाच्या निषेधार्थ घोषणा दिल्या. संबंधित ग्रामस्थांशी संवाद साधत आ. तनपुरे यांनी राज्यातील शिंदे-फडणवीस शासनाच्या स्थगिती धोरणाबाबत टिका साधली. ग्रामिण भागामध्ये अतिवृष्टीने रस्ते नामशेष झाले. शेतकर्‍यांना शेतमाल असो की दूध गावापर्यंत आणणे मुश्किल झाले. ग्रामिण भागातील रस्ते सुधारण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात नगर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोट्यवधी रूपयांचा निधी दिला. हा निधी कोणत्या राजकीय नेत्यासाठी नव्हता. तो निधी जनसामन्यांसाठी होता. परंतु सर्वसामान्यांच्या मुळावर उठलेल्या शिंदे- फडणवीस शासनाने गरळ ओकत विकास कामांनाच स्थगिती देण्याचा सपाटाच सुरू केला आहे.
लोकांचे होणार नुकसान पाहता राष्ट्रवादीचे सर्व आमदार एकवटले आहे. राज्य शासनाला वठणीवर आणण्यासाठी मंत्रालयात विधानसभा, विधानपरिषदेसह जमिनीपर्यंत शासना विरोधात संघर्ष तीव्र केला जाणार आहे. एवढेच नव्हे तर विकास कामांना आडकाठी आणल्याबाबत न्यायालयातही लढा देणार आहे. कोणत्याही परिस्थितीत जनसामन्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी राज्य शासनाला जेरीस आणू. बुलेट ट्रेनला ६ हजार कोटी रूपये देत धनदांडग्यांचे कल्याण करणार्‍या राज्य शासनाने शेतकर्‍यांच्या समस्या सोडविण्याचे आवाहन आ. तनपुरे यांनी केले.
सरसकट मदत जाहिर करा- आ. तनपुरे
   पावसाने संपूर्ण राज्याला वेढा घातला आहे. शेतकर्‍यांवर मोठे संकट ओढावले आहे. आता शेतकर्‍यांचा अंत पाहू नका. पंचनामा, नुकसानीची तीव्रता अशी अट न घालता सरसकट मदत निधी जाहिर करून शेतकर्‍यांवरील संकट दूर करा. किमान दिवाळी सणापूर्वी शेतकर्‍यांना मदत द्या असे कळकळीचे आवाहन आ. प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या रॅलीत केले.

Related Articles

Back to top button