कृषी

कुलगुरुंच्या संकल्पनेतून प्रगतशील शेतकरी व कृषि उद्योजकाचा अनोख्या पध्दतीने सन्मान

राहुरी प्रतिनिधी : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या संकल्पनेतून विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील प्रगतशील शेतकरी व महात्मा फुले कृषि विद्यापीठात पदवी घेतलेले यशस्वी कृषि उद्योजक यांचा परिचय समस्त शेतकरी वर्गाला व्हावा या उद्देशाने कुलगुरु डॉ. पाटील यांनी नविन संकल्पना राबविली आहे.
यामध्ये संबंधीत प्रगतशील शेतकरी व कृषि उद्योजक यांचा योग्य तो सन्मान विद्यापीठ पातळीवर होणार आहे. यामध्ये दर महिन्याला एक प्रगतशील शेतकरी व एक कृषि उद्योजक यांच्या कार्याविषयी माहिती असलेला फलक विद्यापीठ प्रवेशद्वार, कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचा दर्शनी भाग तसेच विद्यार्थी वसतीगृहाचा दर्शनी भाग या ठिकाणी लावण्यात आलेला आहे. जेणेकरुन संबंधीत प्रगतशील शेतकरी व कृषि उद्योजक यांच्या कार्याचा परिचय विद्यापीठाला भेट देण्यासाठी येणार्या शेतकरी, सरकारी अधिकारी व विद्यार्थ्यांना होणार आहे. तसेच या व्यक्तिंचा आदर्श घेऊन तरुण शेतकरी व पदवीधरांना प्रेरणा मिळेल.
कुलगुरुंच्या या संकल्पनेला महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रातील सर्व कृषि महाविद्यालये, कृषि संशोधन केंद्रे, कृषि तंत्र विद्यालये यांनी आपल्या दर्शनीय क्षेत्रात ही आयडॉल्स् प्रत्येक महिन्याला प्रदर्शीत करावीत असे विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख यांनी सुचविले आहे. ऑक्टोबर 2021 या महिन्याकरीता आयडॉल म्हणुन सोनगाव, ता. जावळी, जि. सातारा येथील रब्बी ज्वारी उत्पादक शेतकरी साहेबराव मन्याबा चिकणे व कृषि उद्योजक म्हणुन राहुरी विद्यापीठातून कृषि अभियांत्रिकीचे (एम.टेक) शिक्षण घेतलेले व मोहाडी, ता. दिंडोरी, जि. नाशिक येथील सह्याद्री फार्मस् प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक विलास विष्णू शिंदे यांचा समावेश आहे.
साहेबराव चिकणे यांनी कृषि विभाग, महाराष्ट्र शासन आयोजीत राज्यस्तरीय पीक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. त्यांनी राहुरी विद्यापीठाच्या ज्वारी सुधार प्रकल्पाने विकसीत केलेल्या फुले रेवती या वाणाचे 101 क्विंटल/हेक्टर विक्रमी उत्पादन घेतले. याबद्दल 1 जुलै, 2021 कृषि दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आलेला आहे. कृषि उद्योजक असलेले विलास शिंदे यांनी 15 हजारपेक्षा जास्त शेतकरी सभासद आणि 33 शेतकरी उत्पादक कंपन्या सभासद असलेली सह्याद्री फार्मस् प्रोड्युसर कंपनी स्थापन केली. ही भारतातील सर्वात मोठी द्राक्ष निर्यात कंपनी असून 29,960 एकरपेक्षा अधिक क्षेत्रावर उत्पादन घेणारी 42 देशात फळे व प्रक्रिया उत्पादने निर्यात करते. भारतातील सर्वात मोठी टोमॅटो प्रक्रिया यंत्रणा विकसीत केली असून या कंपनीकडे 15 पेक्षा जास्त अन्न सुरक्षा व गुणवत्तेची राष्ट्रीय तसेच जागतीक प्रमाणपत्रे आहेत. कुलगुरुंनी राबविलेल्या या संकल्पनेचे समस्त शेतकरी वर्गातून स्वागत होत असून शेतकरी तसेच कृषि उद्योजकांचा उचित असा सन्मान विद्यापीठाकडून होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

Related Articles

Back to top button