अहमदनगर

राहुरी कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञ व विद्यार्थ्यांनी दिल्या कृषि उद्योजकांच्या प्रकल्पांना भेटी

कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या संकल्पनेतून अभ्यास दौरा संपन्न…राहुरी कृषि विद्यापीठातील शास्त्रज्ञ व विद्यार्थ्यांचा अभ्यास दौरा 
राहुरी विद्यापीठराष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प व भारतीय कृषि अनुसंधान परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हवामान अद्ययावत शेती व जल व्यवस्थापनाचे आधुनिक विज्ञान व तंत्रज्ञान केंद्र हे महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी येथे कार्यरत असून या प्रकल्पांतर्गत विद्यापीठातील शास्त्रज्ञ व विद्यार्थ्यांनी आधुनिक शेती तंत्रज्ञान पध्दतीचा वापर योग्य पद्धतीने करणार्या पालेकरांच्या फार्मला तसेच अग्रेसर उद्योजक अवी ब्रॉयलरच्या नाशिक येथील युनिटला भेट दिली. महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील यांच्या संकल्पनेतून सदरच्या अभ्यास दौर्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शास्त्रज्ञ व विद्यार्थ्यांनी पिंपळगाव बसवंत येथील श्री. किरण पालेकर यांच्या ग्राफटेक प्लांट्स, पालेकर फार्म्सला भेट दिली. त्यांनी 53 एकरावर द्राक्षाची शेती आधुनिक पद्धतीने करत असताना सोबतच 24 ते 25 द्राक्षांच्या जातींचे कलम तयार करण्याचा व्यवसाय सुरु केला आहे. त्यासाठी त्यांनी एक वेगळ्या युनिटची स्थापना केली आहे. यावेळी त्यांनी द्राक्ष कलम तयार करण्याचे तंत्र सांगितले. एक कलम साधारणतः 120 ते 150 रुपयांना विकले जाते. सदर कलम तयार करण्याचे प्रशिक्षण त्यांनी विदेशातून घेतलेले आहे. शेतीला पूरक व्यवसाय म्हणून द्राक्ष कलम करणे हा सर्वोत्तम व्यवसाय असू शकतो असे त्यांनी सांगितले.

अवी ब्रॉयलरचे संस्थापक आणि अध्यक्ष श्रीकृष्ण गांगुर्डे यांच्या युनिटला भेट दिल्यानंतर विद्यापीठातील शास्त्रज्ञ व विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधताना त्यांनी सांगितले की कुक्कुटपालन शेतीला पूरक व्यवसाय करण्याबरोबरच स्वतंत्रपणे व्यवसाय म्हणूनही करता येवू शकतो. यासाठी चिकाटी आणि येणार्या काळातील आव्हाने ओळखणे, बाजारभावाचा अभ्यास करणे इ. गोष्टी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. या युनिटमध्ये विद्यार्थ्यांना कच्चा माल साफ करणे, प्रक्रिया करणे, पॅलेटिंग, पॅकेजिंग आणि स्टोरेज असे सर्व टप्पे पाहायला मिळाले. कास्ट प्रकल्पाचे प्रमुख संशोधक डॉ. सुनील गोरंटीवार यांच्या मार्गदर्शनाखाली कास्ट प्रकल्पाचे सहप्रमुख संशोधक डॉ. मुकुंद शिंदे यांनी या अभ्यासदौर्याचे नियोजन केले. सदर अभ्यासदौर्यामध्ये विद्यापीठातील विविध विभागाचे 13 शास्त्रज्ञ व 31 विद्यार्थी सहभागी झाले होते.

Related Articles

Back to top button