सामाजिक
राहुरीत १८ नोव्हेंबर रोजी दिव्यांग तपासणी, प्रमाणपत्र वाटप शिबीर- मधुकर घाडगे
राहुरी प्रतिनिधी : राहुरी तालुक्यातील दिव्यांग बांधवांसाठी जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या आदेशाने व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवार दि. 18 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी 9.00 वा. ग्रामीण रूग्णालयच्या वतीने श्री संत गाडगे बाबा आश्रम शाळा राहुरी या ठिकाणी दिव्यांग तपासणी करून ऑनलाईन प्रमाणपत्र वाटप शिबीर आयोजीत करण्यात आले असल्याची माहिती प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष मधुकर घाडगे यांनी दिली आहे.
तालुक्यातील दिव्यांगांना तपासणी व प्रमाणपत्रासाठी प्रत्येक बुधवारी, नगर सिव्हिल हॉस्पिटलला जाणे-येणे शक्य होत नाही. त्यांचे जाण्या-येण्यात खूप हाल होतात. त्यामुळे वेगवेगळ्या तारखेला जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात दिव्यांग तपासणी शिबिर आयोजन केले आहे. तरी राहुरी तालुक्यातील दिव्यांग बंधू- भगिनींनी या शिबिरात तपासणी करून दिव्यांग ऑनलाईन प्रमाणपत्र घ्यावे. प्रमाणपत्र मिळाल्याने शासनाच्या वेगवेगळ्या सवलतींचा लाभ प्राप्त होईल. त्यामुळे या शिबिराचा जास्तीत जास्त दिव्यांगांनी लाभ घ्यावा, असे आवाहन राहुरी तालुका प्रहार दिव्यांग संघटनेचे तालुकाध्यक्ष मधुकर घाडगे यांनी केले.
या शिबिरात अस्थीव्यंग, अंध, मूकबधिर, कर्णबधिर, मतिमंद असे सर्व प्रकारचे दिव्यांगांची तपासणी होणार आहे. यापूर्वी ज्या दिव्यांग व्यक्तिंनी ऑनलाईन प्रमाणपत्र काढलेले आहे, त्यांनी येण्याची आवश्यकता नाही. फक्त ज्यांना नवीन ऑनलाईन प्रमाणपत्र काढावयाचे आहे त्यांनी आपले ओरिजनल आधारकार्ड व ओरिजनल रेशनकार्ड दोन पासपोर्ट साईज फोटो सोबत आणावे. आधार कार्ड व रेशनकार्डची झेराॅक्स सोबत ठेवावी.