निधन वार्ता
राहुरीत विजेचा शॉक लागून एका युवकाचा मृत्यू
राहुरी शहर/अशोक मंडलिक : राहुरी तालुक्यातील बारागाव नांदूर येथील नाजीम पापा देशमुख (32 वर्ष) या तरूण शेतकर्याला वीजेचा शॉक लागल्याने जागीच मृत्यु झाल्याची दुर्देवी घटना शनिवार 20 नोव्हेंबर रोजी घडली आहे. घटनेमुळे संपूर्ण गावामध्ये शोक पसरला होता.
नाजीम देशमुख हे बारागाव नांदूर गावातील अल्प भुधारक शेतकरी होते. नाजीम देशमुख यांच्या पत्नी, आई व मुले हे लग्नासाठी परगावी गेले होते. त्यामुळे घरात एकटेच असतानाच शनिवार दि. 20 रोजी सकाळच्या सत्रात त्यांना शॉक लागून ते गतप्राण झाले होते. सायंकाळच्या सत्रात कुटुंबिय घरामध्ये आले असता त्यांनी नाजीम देशमुख यांना मृतावस्थेत पाहिले. घरामध्ये असलेल्या वीजेच्या थिणग्यांनी त्यांचे शरीर काहीशा प्रमाणात भाजल्याचे निदर्शनास आले.
याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य धनराज गाडे, प्रभाकर गाडे, बार्टीचे इजाज पिरजादे, इम्रान देशमुख, जिल्लूभाई पिरजादे यांनी घटनास्थळी धाव घेतली. शनिवारी रात्री अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली होती. रविवारी सकाळी शवविच्छेदन होऊन दुपारच्या सत्रामध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले. तहसीलदार फसियोद्दीन शेख, कृषी अधिकारी महेंद्र ठोकळे, महावितरण अधिकारी धीरज गायकवाड यांनी घटनेची सविस्तर माहिती घेतली. मृत नाजीम देशमुख यांच्या पश्चात आई, पत्नी, दोन मुली, मुलगा, दोन बंधू असा परिवार होत.