कृषी
राष्ट्रीय स्तरावरील कृषी अलर्ट-२०२१ पुरस्काराने श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र सन्मानित
कोल्हापूर : अल्पावधीतच नावलौकिक मिळवलेल्या श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र, कणेरी मठ यांना विशेष सन्मानाचा राष्ट्रीय स्तरावरील कृषी अलर्ट- २०२१ हा पुरस्कार देण्यात आला.
सदर पुरस्कार भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली, मॅनेज – हैदराबाद, अपेडा – नवी दिल्ली, निती आयोग – भारत सरकार व कृषी अलर्ट संस्था, नवी दिल्ली यांच्यामार्फत प्रदान करण्यात आला. कृषी अलर्ट संस्था, नवी दिल्ली यांच्याद्वारे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमासाठी उपमहानिर्देशक कृषी विस्तार डॉ. ए. के. सिंह, डॉ. चंद्रशेखर ( महानिर्देशक, मॅनेज – हैदराबाद ), डॉ. नीलम पटेल ( मुख्य कृषी सल्लागार, निती आयोग – भारत सरकार ), श्री सुधांशू ( सचिव अपेडा ) व पद्मश्री भारतभूषण त्यागी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.
परमपूज्य अदृश्य काडसिद्धेश्वर स्वामीजी ( चेअरमन श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र, कणेरीमठ ) यांच्या मार्गदर्शनाखाली गेले ३ वर्षापासून सदर केंद्र कार्यरत असून, नैसर्गिक शेती व कृषी विस्तार कार्यासह इतर समाज माध्यमांचा प्रभावीपणे वापर करून कृषी तंत्रज्ञान प्रसारात मोलाची कामगिरी करत आहे. सदर पुरस्कार शाश्वत शेती पद्धती, नैसर्गिक शेती, देशी गोवंश संवर्धन व त्यावर आधारित शेती पद्धती व पोषण मूल्यावर आधारित शेतीमधील विशेष कार्यासाठी प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार श्री सिद्धगिरी कृषी विज्ञान केंद्र, कणेरीचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. रवींद्र सिंह यांनी स्वीकारला.