निधन वार्ता

राज्याचे महसूल मंत्री थोरात यांचे चुलते उद्योजक पंडितराव (तात्या) थोरात यांचे निधन

विलास लाटे/पैठण : राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांचे चुलते व थोरात कारखान्याचे सहकारी संचालक इंद्रजीत भाऊ थोरात यांचे वडील आणि उद्योजक पंडितराव तात्या थोरात यांचे अल्पशा आजाराने (दि.११) नोव्हेंबर रोजी रात्री १०:३० वा. निधन झाले आहे. त्यांच्यावर आज दि.१२ शुक्रवार रोजी सकाळी त्यांच्या ढाकेफळ (ता.पैठण) येथिल सोना फार्म येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या मुशीत तयार झालेले पंडितराव थोरात अत्यंत शिस्तप्रिय व अभ्यासू व्यक्तिमत्व,सातत्याने नाविन्याचा ध्यास घेऊन त्यांनी उद्योग व्यवसायात मोठे यश संपादित केले. याचबरोबर शेतीमध्ये नवनवीन प्रयोग राबवून त्यांना एक प्रगतशील शेतकरी म्हणून ते महाराष्ट्र राज्याला परिचित होते. संगमनेरच्या सहकारी संस्थांनाही त्यांनी सातत्याने मार्गदर्शन केले. जोर्वे येथील दत्त महाराजांवर त्यांची अपार श्रद्धा होती. ते पैठण तालुक्यासह सर्वत्र तात्या या नावाने परिचित होते.

स्वच्छता, टापटीप, नीटनेटकेपणा, नियोजन ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू तरुणांना नेहमी मार्गदर्शक ठरले. त्यांच्या निधनाने तळागाळातील जनतेचे ज्येष्ठ मार्गदर्शक हरपले आहे. त्यांच्या पश्चात पुतणे राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात, पत्नी, मुले इंद्रजीत व रणजित, सूना, नातवंडे, मुली असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनाने अमृत उद्योग समूहातील सर्व विविध संस्थांनी त्यांना आदरांजली अर्पण केली असून पैठण तालुक्यात शोकाकूल वातावरण निर्माण झाले आहे. याप्रसंगी मा.मंत्री अनिल पटेल, रोजगार हमी योजना व फलोत्पादन मंत्री संदिपान पाटील भुमरे, मा.आ.तथा औरंगाबाद काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष डॉ.कल्याण काळे, मा.आ.संजय वाघचौरे, आमदार मोनिका ताई राजाळे, मायनर सेल कॉंग्रेस चे रावसाहेब नाडे, मा.जि.प.अध्यक्ष हरिश्चंद्र लघाने, डॉ सिमा थोरात आदी सामाजिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, महसूल, शेतकरी व प्रतिष्ठित मान्यवरांनी या वेळी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. पैठण तालुक्यातील हजारो शोकाकूल या वेळी उपस्थित होते तर या शेवटच्या निर्वाणीचे सुत्रसंचालन पत्रकार मदन आव्हाड यांनी केले.

ज्येष्ठ मार्गदर्शक हरपले – नामदार थोरात

तीर्थरूप स्व. भाऊसाहेब थोरात यांच्या नंतर कुटुंबप्रमुख म्हणून तात्यांनी भूमिका सांभाळली. दादांच्या मुशीत तयार झालेले तात्या हे अत्यंत कडक शिस्तीचे, टापटीप, स्वच्छता, नीटनेटके नियोजन हे त्यांच्या स्वभावाचे गुणवैशिष्ट. साहित्य संस्कृती अशा विविध क्षेत्रांची त्यांची अभिरुची राहिली. परंतु शेती क्षेत्रामध्ये त्यांनी पूर्णपणे झोकून देऊन नवनवीन प्रयोग राबवले. एक यशस्वी उद्योजक व प्रगतशील शेतकरी याबरोबर सर्वांना सामावून घेणारा मोठ्या मनाचा माणूस असे त्यांचे व्यक्तिमत्व राहिले. त्यांच्या निधनाने आमच्या कुटुंबात व संगमनेर सह पैठण तालुक्याच्या परिवारात मोठी पोकळी निर्माण झाली असून आपले ज्येष्ठ मार्गदर्शक ठरले असल्याची भावना राज्याचे महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे.

कुटुंबाचे ज्येष्ठ आधारवड हरपले – आमदार डॉ.तांबे 

संगमनेर तालुका हा एक परिवार आहे. नामदार बाळासाहेब थोरात यांनी तालुका हा परिवार म्हणून सातत्याने काम केले आहे. या परिवारामध्ये प्रतीथयश उद्योजक पंडितराव तात्या थोरात यांनी कायम जेष्ठ मार्गदर्शकाची भूमिका बजावली. जुन्या पिढीतील अनुभवाची शिदोरी यांसह नवीन दृष्टिकोन घेऊन त्यांनी कायम सर्वांना मार्गदर्शन केले. त्यांच्या निधनाने मार्गदर्शक आधारवड हरपला असल्याची भावना नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार डॉ.सुधीर तांबे यांनी व्यक्त केली.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button