अहमदनगर

आठ दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यावर मदतीचे पैसे जमा न झाल्यास शिवसेना स्टाईल आंदोलन – जिल्हा प्रमुख खेवरे

राहुरी शहर | अशोक मंडलिक : चालू वर्षी राज्यामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस झाला. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. दरम्यान या झालेल्या नुकसानीचे पंचनामे सरकारने करून सुद्धा दोन महिने उलटून गेले तरी अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर कुठलीही मदत जमा झाली नाही. येत्या आठ दिवसांत जर शेतकऱ्यांना ही मदत मिळाली नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना उत्तर जिल्हा प्रमुख पैलवान रावसाहेब खेवरे यांनी सरकारला दिला आहे.
दरम्यान यावर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होऊन शेतकरी हतबल झाला असून शेतीपासून एक रुपयाचेही उत्पन्न शेतकऱ्याला मिळालेले नाही. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला असून सरकारने याचे पंचनामे करून सुद्धा अद्याप पर्यंत एक रुपयाची सुद्धा मदत शेतकऱ्याला मिळाली नसल्यामुळे जर येत्या आठ दिवसांच्या आत शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करणार असल्याचे खेवरे यांनी सरकारला सुनावले आहे.

सरकारने शेतकऱ्यांच्या खात्यावर आठ दिवसांच्या आत मदतीची रक्कम जमा न केल्यास सरकारला कुठलीही पूर्व सूचना न देता शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल. त्याच बरोबर जिल्ह्यात कुठल्याच मंत्र्याला फिरवू देणार नाही असा गर्भित इशारा यावेळी शिवसेना जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे यांनी दिला आहे.

दरम्यान शिंदे फडणवीस सरकारने दिवाळीतच शेतकऱ्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु सरकारने यामध्येही पक्षपातीपणा चालविला असल्याचे दिसून येत आहे व यामध्ये ठराविक ठिकाणीच मदत मिळाली आहे. ठराविक तालुक्यातच सरकारमध्ये सहभागी असलेल्या शेतकऱ्यांना मदत मिळाल्याचा आरोप यावेळी खेवरे यांनी केला आहे.

Related Articles

Back to top button