औरंगाबाद

मेगा फुड कंपनीचे केमिकल युक्त पाणी शेतात

अनेक शेतकऱ्यांचे फळबागांसह खरीप पिकांचे नुकसान

◾शेतकऱ्यांची नुकसान भरपाईची मागणी

◾नसता बाधीत शेतकरी आंदोलनाच्या पवित्र्यात

विलास लाटे/पैठण : पैठण तालुक्यातील धनगाव येथील मेगा फुड पार्क कंपनीने सांडपाण्याचे नियोजन योग्य पद्धतीने न केल्याचा ठपका ठेवत सदर कंपनीचे केमिकल युक्त पाणी कंपनीच्या बाजूला असलेल्या शेतात गेल्याने अनेक शेतकऱ्यांची जमीन बाधीत होवून फळबाग व खरिप पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याची ओरड येथील शेतकऱ्यांनी केली आहे. यासंदर्भात येथील शेतकऱ्यांनी पैठणचे तहसिलदार चंद्रकांत शेळके यांना बाधीत शेतकऱ्यांना त्वरित नुकसान भरपाई देवून सदर केमिकल युक्त पाण्याची कायमस्वरूपी विल्हेवाट लावावी अशी मागणी केली आहे.

धनगाव येथील मेगा फुड पार्क कंपनीच्या आवारातील भिंती लगत असलेल्या तळ्यामध्ये केमिकल युक्त पाणी साचलेले होते. त्यात सध्या सुरू असलेल्या पावसाच्या पाण्याची भर पडल्याने सदर पाणी आजुबाजुच्या शेतात गेल्याने फळबागा व खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असल्याची ओरड येथील शेतकऱ्यांनी निवेदनातून केली आहे. मागील वर्षीही फळबाग व खरीप हंगामातील पिकांचे अशाचप्रकारे नुकसान झाले होते. एवढेच नाही तर काही क्षेत्र या पाण्यामुळे पडीक ठेवण्याची नामुष्की ओढवली होती. कंपनी व्यवस्थापनाला पाण्याची विल्हेवाट करण्यासंदर्भात वारंवार सांगूनही त्याकडे व्यवस्थापन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकरी करत आहे. या पाण्यामुळे दरवर्षी होत असलेल्या नुकसानीमुळे शेतकरी त्रस्त झाले असून या प्रकारामुळे येथील कंपनी शेजारील शेतकऱ्यांना मोठा आर्थिक भुर्दंड सोसावा लागत आहे. याप्रकरणी दि.७ ऑक्टोबर रोजी कृषी सहाय्यक, तलाठी, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी बाधीत शेतकऱ्यांसह सदर नुकसानग्रस्त क्षेत्राची प्रत्यक्ष पाहणी करून पंचनामा करण्यात आला. तहसिलदार यांना निवेदनासह सदर पंचनाम्याचा अहवालही देण्यात आला असून येत्या आठ दिवसांत बाधीत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देवून केमिकल युक्त सांडपाण्याचे नियोजन करावे नसता ग्रामपंचायत सह बाधीत शेतकऱ्यांच्या वतीने कंपनीत जाणारा रस्ता अडविण्यात येईल असा इशारा दिलेल्या निवेदनातून देण्यात आला आहे. निवेदनावर सरपंच मिराबाई कातबणे, उपसरपंच योगेश बोबडे, दत्तात्रय इमले, संजय इमले, ज्ञानेश्वर महाले, विकास नाचण, रावसाहेब बोबडे, बापुसाहेब कातबणेसह आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.

नुकसान झालेल्या शेतकरी व पिकांची नावे…

मिराबाई वसंतराव कातबणे (मोसंबी, तुर), नंदाबाई चोपडे) मोसंबी, तुर, कपाशी), बाळु सातपुते(मोसंबी, कपाशी), राजु सातपुते (मोसंबी, कपाशी), योगेश कातबणे(मोसंबी, सोयाबीन), छाया कातबणे( आंबा, सोयाबीन), वसंत कातबणे(डांळीब, सिताफळ), यज्ञेश कातबणे(पेरु, उडीद, कांदा नर्सरी,केळी, डाळींब, अश्वगंधा, सोयाबीन), तारामती कातबणे( भाजीपाला, कांदा, कपाशी), चंद्रहार कातबणे(तुर), तुळशीराम कातबणे(कपाशी, मोसंबी, भाजीपाला), जनाबाई बोबडे(केळी), संतोष कातबणे(सिडप्लाॅट), योगेश बोबडे(, गंगुबाई बोबडे(डाळींब), प्रभाकर बोबडे(डाळींब), गयाबाई बोबडे (केळी) अशी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांची व पिकांची नावे आहेत.

कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या कडेला चर खोदा...

मागील तीन-चार वर्षांपूर्वी धनगाव ते कंपनी कडे जाणारा रस्ता तयार करण्यात आला होता. मात्र या रस्त्याच्या कडेला चर नसल्याने याचाही फटका दरवर्षी शेतकऱ्यांना बसत आहे. यासंदर्भात कंपनी व्यवस्थापनाला सांगितले असता याची तक्रार तुम्ही एमआयडीसीकडे करून त्यांच्याकडून नुकसान भरपाई घ्या असे उडवाउडवीचे उत्तर दिले जाते. सदर रस्त्याच्या कडेला चर खोदा अशी मागणीही संबंधित शेतकऱ्यांनी केली आहे.

पारंपरिक ओढ्यावर भराव टाकून पैठण मेगा फुड पार्क यांनी रोड केला. व साईड ला चाऱ्या पण केल्या नाही. त्यामुळे जवळपास ३० हे.पेक्षा जास्त क्षेत्राचे १०० टक्के नुकसान झाले आहे. तरी कंपनी प्रशासन यांनी शेतकऱ्यांना पूर्ण नुकसान भरपाई व कंपनी दूषित सांडपान्याची व्यवस्था करावी.अन्यथा ८ दिवसानंतर सर्व शेतकरी रस्ता बंद करतील.

यज्ञेश वसंतराव कातबने, शेतकरी

कंपनी प्रशासनाला वेळोवेळी दूषित पाण्याविषयी समज दिली, परंतू त्याचा कुठला उपयोग झाला नाही. ग्रामपंचायत ने त्याबद्दल अहवाल तहसील कार्यालयाला दिला आहे. आज मोठ्या प्रमाणात शेतीचे न भरून येणारे नुकसान झाले आहे. या कंपनीमुळे वन्यजीव प्राण्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांनी तात्काळ उपाययोजना कराव्यात, अन्यथा शेतकरी उद्रेक करतील. त्याला संपूर्णपणे कंपनी जबाबदार असेल.

योगेश बोबडे, उपसरपंच, ग्रामपंचायत, धनगांव.

Krantinama Team

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक,क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button