अहमदनगर

जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने शेतकरी कुटुंबातील ट्रेकर अर्चना गडदे हिचा सन्मान

उत्तराखंडच्या ट्रेकसाठी मुलीच्या पंखाना बळ देण्याकरिता फाऊंडेशनची आर्थिक मदत…


अहमदनगर (प्रतिनिधी)– कुटुंबातील बिकट परिस्थितीवर मात करुन ट्रेकिंगने गड, किल्ले व कळसुबाई सारखे शिखर सर करणार्‍या अर्चना गडदे या युवतीचा गौरव माजी सैनिकांच्या जय हिंद सैनिक सेवा फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आला. तर उत्तराखंडच्या ट्रेकसाठी शेतकरी कुटुंबातील या मुलीच्या पंखाना बळ देण्यासाठी फाऊंडेशनच्या वतीने आर्थिक आधार देऊन प्रोत्साहन देण्यात आले.

पाथर्डी तालुक्यातील हंडाळवाडी येथील शेतकरी कुटुंबातील अर्चना गडदे या युवतीने आपल्या जिद्दीच्या जोरावर तब्बल 40 ट्रेक केले आहे. घरची परिस्थिती बिकट असल्याने एका कंपनीत काम करुन एम.ए. चे शिक्षण घेत आहे. शिक्षण घेत असताना ट्रेकिंगची आवड असल्याने तिने अनेक गड, किल्ले व नुकतेच पाथर्डी ते कळसुबाई शिखर सर केले आहे. या शेतकरी कुटुंबातील लेकिच्या कर्तृत्वाला सलाम करुन माजी सैनिकांच्या वतीने तिला 5 हजार रुपयाचा धनादेश देऊन सन्मान करण्यात आला. यावेळी जय हिंदचे शिवाजी पालवे, शिवाजी गर्जे, निवृती भाबड, जगन्नाथ जावळे, संतोष शिंदे, भाऊसाहेब देशमाने, युवराज गावडे, रघुनाथ औटी, रामराव दहिफळे, ज्ञानदेव औटी, दुर्गाताई तनपुरे आदी उपस्थित होते.

शिवाजी पालवे म्हणाले की, एका शेतकरी कुटुंबातील मुलगी आपले कर्तृत्व सिध्द करीत आहे. मात्र आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने त्याला पुढचे ध्येय गाठण्यासाठी अडचणी येत असून, फाऊंडेशनने तिला प्रोत्साहनपर मदत दिली असून, इतर सामाजिक संघटना व दानशूर व्यक्तींनी या शेतकरीच्या मुलीला उंच भरारी घेण्यासाठी पाठबळ देण्याचे त्यांनी सांगितले.  

अर्चना गडदे लवकरच उत्तराखंड मधील यमुनोत्री, गंगोत्री, गोमुख, तपोवन, केदारनाथ, त्रीयुगीनारायण, मदमहेश्‍वर, तुंगनाथ, चंद्रशिला, रुद्रप्रयाग, धारीदेवी असा जवळपास 900 कि.मी. च्या ट्रेकसाठी जात आहे. या ट्रेकसाठी तिला आर्थिक पाठबळाची गरज असून, तिला आर्थिक मदत करण्याचे आवाहन जय हिंद सैनिक फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.

Related Articles

Back to top button