साहित्य व संस्कृती

संतत्व माणसाच्या हृदयाची खरी श्रीमंती आहे- डॉ. रामकृष्ण जगताप

श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) : मानवी संस्कृती ही समर्पण आणि प्रामाणिक जगण्यातून आकाराला आली आहे. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी लिहिलेल्या “संत साहित्याची ज्योत ” ह्या कवितासंग्रहातून माणसाच्या मनातील संतत्वाचा प्रत्यय येतो. कारण संतत्व हीच खरी श्रीमंती आहे. ती वाढली की माणूस समाधानी होतो असे मत संमोहनतज्ञ आणि उंबरगाव जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक डॉ.रामकृष्ण जगताप यांनी व्यक्त केले.

येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे डॉ. बाबुराव उपाध्ये यांच्या “संत साहित्याची ज्योत ” ह्या कवितासंग्रहाचे प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. रामकृष्ण जगताप बोलत होते. अध्यक्षस्थानी रयत शिक्षण संस्थेचे राहाता येथील शारदा ज्यूनिअर कॉलेजचे प्रा. डॉ.शिवाजी काळे होते. प्रारंभी वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष गणेशानंद उपाध्ये यांनी मान्यवरांचा सन्मान केला. औरंगाबाद येथील चरित्रलेखक, मुक्त पत्रकार क्षितिज प्रकाशनचे संतोष रंगनाथ लेंभे यांनी सुंदर पुस्तक निर्मिती केली त्याबद्दल त्यांचा “मीना मुख्याध्यापिका ” ग्रंथ देऊन डॉ. रामकृष्ण जगताप आणि सौ. उज्वला जगताप यांनी सत्कार केला. तसेच डॉ. रामकृष्ण जगताप यांच्या राज माइंड पावर पब्लिकेशनतर्फेे “मीना मुख्याध्यापिका” हा सुंदर चरित्रगौरवग्रंथ प्रकाशित केल्याबद्दल तर डॉ.शिवाजी काळे यांनी कवितासंग्रहाला समर्पक अशी दीर्घ प्रस्तावना लिहिल्याबद्दल सत्कार करण्यात आले.

वाचन संस्कृती प्रतिष्ठानच्या कोषाध्यक्ष सौ. मंदाकिनी बाबुराव उपाध्ये, सौ.आरती गणेशानंद उपाध्ये यांनी उपस्थितांचे सत्कार केले. डॉ.जगताप, डॉ. काळे. प्रकाशक लेंभे यांनी डॉ. उपाध्ये यांना श्रीरामपूर नगरपरिषदेचा मानाचा असा “श्रीरामपूर भूषण पुरस्कार ” देऊन नागरी सन्मान झाला त्याबद्दल मनोगत व्यक्त करून त्यांचा सत्कार करण्यात आला. लोकनियुक्त नगराध्यक्षा अनुराधा आदिक आणि नगरसेवक, संयोजक यांचे आभार मानत चांगली दखल घेतल्याबद्दल कौतुक करण्यात आले. डॉ. जगताप यांनी डॉ. उपाध्ये यांच्या “संत साहित्याची ज्योत ” मधील कवितांचे वाचन करून ही कविता जीवनमूल्ये पेरणारी आणि समाधानाची श्रीमंती सांगणारी कविता असल्याचे मत व्यक्त केले.

डॉ. शिवाजी काळे हे अध्यक्षीय भाषणात म्हणाले, डॉ. बाबुराव उपाध्ये यांची कविता अनुभव, चिंतन आणि प्रबोधन जाणिवेतून व्यक्त होते. ती काव्यतंत्र आणि तालाच्या चौकटीची वाट पाहत बसत नाही, ती सहजपूर्त उत्कट भावनेतून निर्माण होते. ती हृदयाला जपते आणि मनाला मानते, त्यामुळे त्यांची कविता मुक्त मनाचा अनुभव देते, त्यांच्यातले पुरोगामी संतत्व ह्या कवितेत आहे असे मत मांडले. सौ.आरती उपाध्ये यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.

Related Articles

Back to top button