औरंगाबाद

महावितरणच्या गलथान कारभाराचा शॉक; शेतकऱ्यांचा सात एकर ऊस जळून खाक

छावा क्रांतिवीर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पाहणी करून शेतकऱ्यांना दिला धीर…

विलास लाटे/पैठण : पैठण तालुक्यातील नांदर शिवारामधील तीन शेतकऱ्यांना महावितरणच्या उदासीन कारभाराचा फटका बसला आहे. शेतावर लटकणाऱ्या विजेच्या तारांमुळं आग लागून लाखो रुपयांचा ऊस जळून खाक झाल्याची घटना नुकतीच घडली आहे. शॉर्टसर्किटमुळं तीन शेतकऱ्यांच्या शेतातील ऊस जळून खाक झाला असून त्यामुळं सुमारे दहा ते बारा लाख रुपयांचं नुकसान झालं आहे.

नांदर येथील गट नंबर २२७ मध्ये लोंबकळणाऱ्या विजेच्या तारांचे घर्षण होऊन लागलेल्या आगीत सुरेश लक्ष्मण कोल्हे, पद्मावती भाऊसाहेब कोल्हे, विठ्ठल बाबासाहेब काळे यांच्या शेतातील सात एकर क्षेत्रावरील ऊस जळून खाक झालाय. या शेतकऱ्यांनी संपूर्ण क्षेत्रात आडसाली उसाची लागवड केली होती. थोड्याच दिवसात हा ऊस कारखान्यात गाळपासाठी नेला जाणार होता. मात्र, त्याआधीच ही दुर्घटना घडली आहे. विद्युततारा शेतात लोंबकळल्याने आग लागली असल्याची चर्चा होत असून स्थानिक कर्मचाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळे ही दुर्घटना घडली. दरम्यान, वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली असून नुकसानग्रस्त पिकाचा पंचनामा करून लवकरात लवकर आर्थिक नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान घटनास्थळी छावा क्रांतिवीर सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी भेट देवून संबंधित शेतकऱ्यांना काही अडचण आल्यास संघटना तुमच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिल असा धीर दिला आहे.

यावेळी संघटनेचे प्रदेश सरचिटणीस अनिल राऊत, मराठवाडा अध्यक्ष रामेश्वर बावणे, मराठवाडा सचिव भगवान सोरमारे, सोमनाथ रोडगे यांच्यासह नुकसानग्रस्त शेतकरी बांधव उपस्थित होते.

Krantinama Team

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक,क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button