धार्मिक

पेमगिरीत 21 मे रोजी जाकमतबाबा महावटवृक्ष यात्रोत्सव

संगमनेर | बाळासाहेब भोर : तालुक्यातील स्वराज्य संकल्पभूमी पेमगिरीत दि. 21 मे रोजी महाराष्ट्रातील सर्वात मोठा महावटवृक्ष व त्या वटवृक्षाखाली असलेलं दैवत जाकमतबाबांचा यात्रा उत्सव मोठ्या दिमाखात संपन्न होणार आहे.

भारतीय संस्कृतीत आपण पूर्वीपासूनच विशिष्ट वृक्षांना देवता मानत आलो आहोत. त्याप्रमाणे वडाच्या झाडालाही अनन्य साधारण महत्व आहे. ऐतिहासिक व नैसर्गिकदृष्ट्या स्वयंपूर्ण असलेल्या पेमगिरीतील महावटवृक्षाची यात्रा म्हणजे भाविक असो वा पर्यटक यांच्यासाठी जणू काही मोठी पर्वणीच असते.

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या या वटवृक्षाची थंडगार व अल्हाददायक सावली, पक्षांचा सुरु असणारा सुमधुर किलबिलाट, मध्येच एखाद्या ठिकाणी पालवीतुन हळुवार डोकावणारी सूर्यकिरणे, एकमेकांच्या हातात हात देत एकजूटीची साद घालणाऱ्या या वटवृक्षाच्या पारंब्या बघून मन अगदी प्रसन्न होऊन जाते. हिच खरी निसर्गाची अदभूत देणगी आहे.

दि. 21 मे रोजी सकाळी महावटवृक्षाखाली महापूजा संपन्न होईल. तद्नंतर काठीची पुजा व संपूर्ण गावातून भव्य मिरवणूक तसेच रात्री लोकनाट्य तमाशाचा कार्यक्रम होणार आहे. दुसऱ्या दिवशी दुपारी पैलवानांचं गाव म्हणून ओळख असलेल्या याच गावात कुस्त्यांचा जंगी हंगामा होणार आहे. मे महिना म्हटलं की उन्हाचा पारा नेहमीच चढलेला मात्र या महाकाय वटवृक्षाच्या सानिध्यात,थंडगार सावलीत प्रवेश केल्यानंतर पुन्हा पाऊले मात्र लवकर घराकडे वळत नाहीत हा येथे भेट देणाऱ्या प्रयेक व्यक्तीचा अनुभव आहे.

पंचक्रोशीतील जास्तीत जास्त भाविकांनी जाकमतबाबा महावटवृक्ष यात्रा उत्सवात सहभागी व्हावे असं आवाहन समस्त ग्रामस्थ पेमगिरीकरांच्या वतीने करण्यात आलं आहे.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button