कृषी

महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या ज्वारी वाणांनी केली राज्यात उत्पादनाची क्रांती

राहुरी विद्यापीठ प्रतिनिधीनगदी पिकांबरोबरच तृणधान्य पिकांचा कृषि उत्पन्नामध्ये मोठा वाटा आहे. तृणधान्य पिके हे अवर्षणप्रवण भागातील शेतकर्यांसाठी शाश्वत उत्पादनाचे स्त्रोत आहेत. तृणधान्य पिकांचे आहारामध्ये अनन्यसाधारण महत्व आहे. या तृणधान्य पिकांमध्ये ज्वारी हे महत्वाचे पीक आहे. ज्वारी प्रामुख्यानेे लोे कॅलरीज म्हणून खाद्य पदार्थात वापरतात. ज्वारीमध्ये भरपूर तंतूमय घटक, स्टार्च, फायटोकेमिकल्स आणि न्यूट्रास्फुटिक्लस इ. गुणकारी घटक असतात.

महाराष्ट्रात रब्बी ज्वारी खाली सन 2020-21 मध्ये 16.6 लाख हेक्टर क्षेत्रावर लागवड होती. त्यामध्ये 23 टक्के क्षेत्र हे हलक्या जमिनीचे, 48 टक्के मध्यम जमिनीचे तर 29 टक्के क्षेत्र हे भारी जमिनीचे आहे. यामधून मागील वर्षी राज्याला 17.4 लाख टन ज्वारीचे उत्पादन मिळाले. राज्यामधील एकुण ज्वारीच्या क्षेत्रापैकी 25 टक्के क्षेत्र महात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या विकसीत वाणांखाली आहे. यामध्ये फुले रेवती खाली 10%, फुले वसुधा खाली 9% आणि इतर वाणांखाली सहा टक्के आहे.

सन 2011-12 पासून म्हणजेच मागील 10 वर्षाचा विचार करता राज्याची ज्वारी उत्पादकता 91 टक्क्याने वाढली आहे, ज्वारी उत्पादन 31 टक्क्याने वाढले असून रब्बी ज्वारीखालील क्षेत्र 43 टक्क्यांनी कमी झाले आहे. म्हणजेच ज्वारीचे क्षेत्र कमी होवून देखील उत्पादन वाढले आहे. ज्वारीचे उत्पादन वाढण्यामध्ये महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसीत केलेल्या रब्बी ज्वारी वाणांचा व पंचसूत्री तंत्रज्ञानाचा मोठा वाटा आहे. महात्मा फुले कृषि विद्यापीठाने रब्बी ज्वारीसाठी जमिनीच्या प्रकारानुसार वाणांचे संशोधन केलेले आहे. त्यामध्ये हलक्या जमिनीसाठी फुले अनुराधा, फुले माऊली, मध्यम जमिनीसाठी फुले सुचित्रा तर भारी जमिनीसाठी फुले वसुधा, बागायतीसाठी फुले रेवती तर ज्वारीच्या इतर उपयोगांसाठी म्हणजेच हुरडयासाठी फुले मधुर, लाहयांसाठी फुले पंचमी व पापड बनविण्यासाठी फुले रोहिणी या वाणांचे संशोधन केले आहे.

महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विसकीत केलेले रब्बी ज्वारीचे वाण आणि विद्यापीठाने शिफारस केलेल्या पंचसूत्री तंत्रज्ञानाचा वापर केला तर शेतकर्यांना रब्बी ज्वारीत विक्रमी उत्पादनात घेता येईल. याचे उदाहरण म्हणजे सातारा येथील सोनगाव सारख्या दुर्गम भागातील प्रगतशील शेतकरी साहेबराव मन्याबा चिकणे यांनी फुले रेवती या रब्बी ज्वारीच्या वाणाचे हेक्टरी 101 क्विंटल इतके उच्चांकी उत्पादन घेऊन राज्यात रब्बी ज्वारी पीक स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला तसेच वाई तालुक्यातील वरखडवाडी येथील युवा शेतकरी नितीन बाजीराव वरखडे यांनी ज्वारीचे हेक्टरी 90 क्विंटल उत्पादन घेवून राज्यात तृतीय क्रमांक मिळविला. फुले रेवती हा वाण बागायती क्षेत्रामध्ये खतांना चांगला प्रतिसाद देतो. ज्वारी वर येणार्या खोडमाशी व खडखडया यासारख्या किड व रोगांना प्रतिकारक्षम वाण आहे. फुले रेवती वाणाच्या भाकरी व कडब्याची चव पारंपारीक मालदांडी सारख्या वाणाप्रमाणेच असल्यामुळे हा वाण शेतकर्यांमध्ये लोकप्रिय झालेला आहे.
महात्मा फुले कृषि विद्यापीठाद्वारे रब्बी ज्वारीचे विविध वाणांचे मुलभुत, पायाभुत बियाण्यांची निर्मिती केली जाते. हे मुलभुत बियाणे पुढे महाबीजला दिले जाते. या मुलभुत बियाण्यांपासून महाबीज पायाभुत, सत्यप्रत आणि प्रमाणीत बियाण्यांची निर्मिती करुन शेतकर्यांना देते. विद्यापीठाने जमिनीच्या प्रकारानुसार ज्वारीचे वाण विकसीत केलेले आहे. शेतकर्यांनी जमिनीच्या प्रकारानुसार वाणांची निवड करावी व पंचसूत्रीचा वापर करुन भरघोस उत्पादन घ्यावे. 
  – कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील
महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसीत केलेल्या ज्वारीच्या वाणांमुळे आणि उत्पादन तंत्रज्ञानामुळे राज्याची ज्वारीची उत्पादकता दुपटीवरुन अधिक वाढली आहे. सन 2011-12 मध्ये राज्याची ज्वारीची उत्पादकता हेक्टर 5.5 क्विंटल होती. सन 2020-21 मध्ये राज्याची ज्वारीची उत्पादकता हेक्टरी 10.5 क्विंटल झाली आहे. ही उत्पादकता विद्यापीठाने विकसीत ज्वारीचे वाण फुले रेवती, फुले सुचीत्रा, फुले वसुधा, फुले अनुराधा आणि पंचसूत्री तंत्रज्ञानामुळे वाढलेली आहे.
संचालक संशोधन डॉ. शरद गडाख

Related Articles

Back to top button