महाराष्ट्र
महात्मा फुले कृषि विद्यापीठाला राष्ट्रीय सेवा योजनेतील पुरस्कार जाहीर
राहुरी विद्यापीठ प्रतिनिधी : सन 2020-21 चे राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर झाले असून यात महात्मा फुले कृषि विद्यापीठातील विद्यार्थी अनिकेत वाकळे यांना उत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार तर प्रा. प्रविण गायकर यांना कार्यक्रम अधिकारी म्हणुन प्रोत्साहनपर पुरस्काराची घोषणा नुकतीच करण्यात आली.
केंद्र शासनाच्या पध्दतीवर आधारीत राज्यस्तरावर राज्याच्या रौप्य महोत्सवी वर्षापासून राष्ट्रीय सेवा योजनेतंर्गत पुरस्कार देण्याची प्रथा सन 1993-94 वर्षापासून सुरु करण्यात आली. त्यानुसार महाराष्ट्रातील कृषि व अकृषि अशा 27 विद्यापीठांकडून प्रस्ताव मागविण्यात आले. राज्यस्तरीय पुरस्कार निवड समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रीय सेवा योजनेतंर्गत सन 2020-21 या वर्षात निस्वार्थ भावनेने व निष्ठेने समाजाची सेवा करणार्यांना त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या निस्वार्थ सेवेचा यथोचीत गौरव करण्याच्या दृष्टीने दि. 12 ऑगस्ट, 2021 रोजी राज्यस्तरीय पुरस्काराची घोषणा शासन निर्णय क्र. रासेयो-2021/प्र.क्र.60/6 शी-7 अन्वये करण्यात आली. यात कृषि महाविद्यालय, पुणेचा विद्यार्थी अनिकेत रविंद्र वाकळे यांस महाराष्ट्र राज्य सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक राज्यस्तरीय पुरस्कार तर लोणी कृषि जैव तंत्रज्ञान महाविद्यालयाचे कार्यक्रम अधिकारी प्रा. प्रविण गायकर यांना राज्यस्तरीय प्रोत्साहनपर पुरस्कार जाहीर करण्यात आले. सदर पुरस्कार मिळाल्याबद्दल महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील, राष्ट्रीय सेवा योजनेचे राज्य संपर्क प्रमुख डॉ. देसाई, पुणे येथील केंद्रीय प्रादेशिक संचालक महाराष्ट्र व गोवा डॉ. कार्तीकेयन, अजय शिंदे, माजी राज्य संपर्क प्रमुख डॉ. अतुल साळुंके, अधिष्ठाता डॉ. अशोक फरांदे, संशोधन तथा विस्तार शिक्षण संचालक डॉ. शरद गडाख, कुलसचिव प्रमोद लहाळे, राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक तथा विद्यापीठ विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. महावीरसिंग चौहाण, सहयोगी अधिष्ठाता कृषि महाविद्यालय, पुणे डॉ. सुनिल मासाळकर, कृषि जैव तंत्रज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य ॠषिकेश औताडे, पुणे येथील कृ.म. विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. प्रमोद पाटील, कार्यक्रम अधिकारी डॉ. राजेंद्र भिलारे, डॉ. दिपक सावळे, डॉ. नजीर तांबोळी, नेहरु युवा केंद्र जिल्हा युवा समन्वयक अधिकारी अशोककुमार मेघवाल यांनी अनिकेत रविंद्र वाकळे व प्रा. प्रविण गायकर यांना भावी वाटचालीस शुभेच्छा देवून अभिनंदन केले आहे. वाकळे हा धुळे येथील रहिवासी असून तो प्राथमिक शिक्षक रविंद्र वाकळे यांचे सुपूत्र आहे.