कृषी

महात्मा फुले कृषि विद्यापीठ व मॅग्नेट यांच्यामध्ये कृषि तंत्रज्ञानासाठी सामंजस्य करार

राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी व आशियाई बँक अर्थ सहाय्य महाराष्ट्र कृषि व्यवसाय साखळी प्रकल्प (मॅग्नेट प्रकल्प) यांच्यामध्ये विविध फळ पिके, भाजीपाला व फुले यांच्या सेंटर ऑफ एक्सचेंज संदर्भात सामंजस्य करारावर कृषि महाविद्यालय पुणे येथे स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. महाराष्ट्र कृषि व्यवसाय साखळी प्रकल्प मॅग्नेट प्रकल्प अंतर्गत उद्यानविद्या पिकांमधील पुरवठा साखळीमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करून शेतकरी उत्पादक कंपन्यांना तांत्रिक मार्गदर्शन करणे व अर्थसाह्य पुरविणे हा हेतू आहे. सदर हेतू साध्य करण्यासाठी अद्ययावत कृषी तंत्रज्ञान हे कृषि विद्यापीठाकडून उद्यान विद्यापीठांमध्ये पुरवठा साखळीमध्ये प्राथमिक लागवड तंत्रज्ञानापासून ते काढणी पश्चात हाताळणी व कृषि प्रक्रिया उद्योगापर्यंत तांत्रिक मार्गदर्शन प्राप्त होणार आहे.
कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील यावेळी म्हणाले की कृषी विद्यापीठाकडे विविध पिकांमध्ये अद्ययावत संशोधन झाले असून या उपक्रमातून हे तंत्रज्ञान शेतकरी उत्पादक कंपन्यांना उपलब्ध होण्यास मोठी मदत होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल तसेच मॅग्नेटमध्ये अर्थसाहाय्य झाल्यास विद्यापीठांमध्ये अद्ययावत उती संवर्धन प्रयोगशाळा व रोपवाटिका उभारून शेतकऱ्यांना चांगल्या प्रतीचे रोगमुक्त रोपे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न राहील. मॅग्नेट प्रकल्पाचे प्रकल्प संचालक दीपक शिंदे यावेळी म्हणाले की या सामंजस्य कराराअंतर्गत पेरू, डाळिंब, स्ट्रॉबेरी, सीताफळ, केळी, भेंडी, लाल मिरची, हिरवी मिरची व निशिगंध या पिकांचे सेंटर ऑफ एक्सलन्सची उभारणी करण्यात येणार आहे. या सामंजस्य करारावर कुलगुरू डॉ. पी.जी. पाटील व दीपक शिंदे यांनी स्वाक्षऱ्या केल्या.
या कार्यक्रमासाठी पुणे कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सुनील मासाळकर, गणेशखिंड येथील राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पाचे संशोधन संचालक डॉ. विनय सुपे, राहुरी येथील अखिल भारतीय फळपिके संशोधन प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ. सतीश जाधव, फळपिके संशोधन प्रकल्पाचे वनस्पती रोग शास्त्रज्ञ डॉ. विकास भालेराव तसेच मॅग्नेटचे डॉ. अमोल यादव, संपत यादव, कु. अश्विनी दरेकर हे अधिकारी उपस्थित होते. सदर सामंजस्य करारासाठी उद्यानविद्या विभाग प्रमुख डॉ. श्रीमंत रणपिसे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

Related Articles

Back to top button