महाराष्ट्र

डॉ. मिलिंद अहिरे डॉ. जी.एस. विद्यार्थी पुरस्काराने सन्मानीत

राहुरी विद्यापीठमहात्मा फुले कृषि विद्यापीठाच्या पदव्युत्तर महाविद्यालयातील कृषि विस्तार व संज्ञापन विभाग प्रमुख आणि हळगाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहिरे यांना भारतीय विस्तार शिक्षण सोसायटीचा मानाचा समजला जाणारा डॉ. जी.एस. विद्यार्थी पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. हा पुरस्कार कृषि माहिती संवाद आणि विस्तार कार्यात उल्लेखनीय कार्य करणार्या विस्तार शास्त्रज्ञाला देण्यात येतो.

उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील बनारस हिंदू विद्यापीठात भारतीय विस्तार शिक्षण सोसायटीच्या राष्ट्रीय परिसंवादात उत्तर प्रदेश राज्याचे सामाजीक न्याय विभागाचे राज्यमंत्री रविंद्र जैसवाल यांचे शुभहस्ते सदरचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी बांदा कृषि विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु व भारतीय विस्तार शिक्षण सोसायटीचे अध्यक्ष डॉ. यु.एस. गौतम, भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्या विस्तार विभागाचे उपमहासंचालक डॉ. ए.के. सिंग यावेळी उपस्थित होते. हा पुरस्कार मिळाल्यामुळे डॉ. आहिरे यांचे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

डॉ. आहिरे हे कृषि विस्तार व संज्ञापन विभाग प्रमुख असून त्यांच्याकडे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृषि महाविद्यालय, हळगावचा सहयोगी अधिष्ठाताचा अतिरीक्त पदभार आहे. डॉ. अहिरे यांनी या अगोदर धुळे कृषि महाविद्यालयाचा सहयोगी अधिष्ठाताचा पदभार सक्षमपणे सांभळला आहे. डॉ. मिलिंद अहिरे यांनी 2005 साली जी.बी. पंत कृषि आणि तंत्रज्ञान विद्यापीठातुन कृषि विस्तार या विषयात पीएच.डी. संपादन केली आहे. कृषि विद्यापीठात त्यांना विविध पदांचा 25 वर्षाचा अनुभव असुन ते विद्यापीठाचा महत्वाचा आणि मानाचा समजला जाणारा भाकृअप समन्वय अधिकारी या पदाचा अतिरिक्त पदभार आणि विद्यापीठाच्या नियोजन, मुल्यमापन आणि देखरेख प्रकल्पाचे प्रमुख म्हणुन सक्षमपणे काम पाहिले आहे. इंडियन सोसायटी ऑफ एक्स्टेन्शन एज्युकेशन नवी दिल्ली पश्चिम विभागाचे उपाध्यक्ष म्हणून काम करीत आहेत. महाराष्ट्र सोसायटी ऑफ एक्सटेन्शन एजुकेशनच्या सहसचिवपदी त्यांची नेमणुक असुन सोसायटी ऑफ कृषि विज्ञानच्या पश्चिम विभागाचे समन्वयक म्हणुन ते काम बघत आहे. आंतरराष्ट्रीय विस्तार शिक्षण सोसायटी नागपूरचे सहसचिवपदावर ते काम करत आहेत.

धुळे येथील कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ म्हणुन त्यांनी चार वर्ष शेतकरीभिमुख विस्तार कार्य केले आहे. त्यांनी आतांपर्यंत 14 एम.एस्सी. (ॲग्री) आणि 6 पीएच.डी. च्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आहे. कृषि विद्यापीठाचे प्रसारण केंद्र प्रमुख असताना त्यांनी विविध विद्यापीठ प्रकाशनांचे संपादन केले आहे. यामध्ये कृषिदर्शनी, श्रीसुगी, कृषिवार्ता असे अनेक प्रकाशनांचे संपादन त्यांनी केले आहे. कृषि विद्यापीठाच्या तसेच राज्यस्तरीय विविध समित्यांवर त्यांची तज्ञ सल्लागार आणि सदस्य म्हणुन नेमणूक आहे. त्यांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे. यामध्ये मानाचा समजला जाणारा युवा शास्त्रज्ञ पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. त्यांचे आतांपर्यंत 100 शास्त्रीय लेख विविध शास्त्रीय नियतकालीकांमध्ये प्रसिद्ध झाले असुन विविध पुस्तकांचे त्यांनी संपादन केलेले आहे. डॉ. मिलिंद अहिरे यांचे शेतकर्यासाठी 60 हून अधिक कृषि विषयक लेख वृत्तपत्रांमध्ये आणि मासिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत.

Related Articles

Back to top button