अहमदनगर

महात्मा गांधी यांचा सेवाभावाचा आदर्श भूमी फौंडेशन जपत आहे : किशोर निर्मळ

श्रीरामपूर[बाबासाहेब चेडे] : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी भारतीय समाजकारणात राजकारणात व सर्व क्षेत्रात आदर्श ठसा उमटविला आहे. सर्वसामान्य माणूस हाच राष्ट्र स्वातंत्र्याचा उद्गाता मानून त्यांनी भारतीय स्वातंत्र्य मिळविले अशा महात्मा गांधींचा आदर्श जपत प्रा.कैलास पवार यांचे भूमी फौंडेशन महाराष्ट्र सेवाभावी संस्था कार्य करीत आहे, असे मत प्रभात डेअरी उद्योजक किशोरअण्णा निर्मळ यांनी व्यक्त केले.


येथील भूमी फौंडेशन तर्फे महात्मा गांधी यांचे १५२ वी जयंती व माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंतीनिमित्त प्रा.तौसीफ शेख यांच्या सभागृहात विविध सेवाभावाचे उपक्रम आयोजित करण्यात आले होते. त्याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून किशोरअण्णा निर्मळ बोलत होते. अध्यक्षस्थानी अहमदनगर येथील गरुड हॉस्पिटलच्या प्रमुख डॉ पद्मजा गरुड होत्या. प्रमुख उपस्थिती महाराष्ट्र संपादक परिषदेचे कार्याध्यक्ष, पत्रकार प्रकाश कुलथे, साहित्यिक डॉ बाबुराव उपाध्ये, औरंगाबाद येथील प्रा.शैलेंद्र भणगे, पत्रकार बाबासाहेब चेडे, आरोग्यमित्र भीमराज बागुल, प्रा.सुनील धस, पत्रकार प्रवीण जमधडे, सौ मनीषा कोकाटे, प्रा.प्रमोद निर्मळ, प्रा तौसीफ शेख, उपप्राचार्य पांडुरंग पवार, सोनाली सोनावणे इत्यादींची होती. प्रारंभी म.गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. भूमी फौंडेशन प्रमुख प्रा.कैलास पवार यांनी स्वागत व प्रास्तविक केले.


यावेळी राज्यस्तरीय निबंध स्पर्धेत प्रत्येक विषयात प्रथम क्रमांक मिळविलेले पुणे येथील उपप्राचार्य पांडुरंग पवार, श्रीरामपूर येथील सोनाली सोनावणे, विधिज्ञ पांडुरंग औताडे यांना सन्मान चिन्ह बुके शाल श्रीफळ व डॉ उपाध्ये लिखित ग्रंथ देऊन पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. वृद्धांना, मोफत श्रवण यंत्राचे वाटप करण्यात आले. त्यामध्ये प्रातिनिधिक स्वरुपात कडू शंकर येवले, गंगाधर साळवे, बबनराव भोसले, वामन वानखेडे, सुलाबाई धनेधर हे होते.

प्रमुख पाहुणे म्हणून किशोरअण्णा निर्मळ यांनी म.गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या निरपेक्ष सेवाभावी देशकार्याचा आढावा घेतला. सामान्य माणूस जागा झाला की राष्ट्र पुढे जाते असे सांगून ते म्हणाले श्रीरामपूरमध्ये पत्रकार प्रकाश कुलथे हे पत्रकारितेच्या उच्च पदावर असल्याने ते आपल्या पदाचा उपयोग निरपेक्षपणे कार्य करीत आहे. पत्रकार सर्वसामान्य माणूस यांच्या मदतीला धावून जातात पण प्रसिद्धीपासून लांब असतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ३२ मिनिटे मुलाखत घेतली असे त्यांचे अनेक अनुभव आजच्या युवकांनी समजून घ्यावे. डॉ बाबुराव उपाध्ये यांनी प्रतिकूल परिस्थितीतून जीवन घडविले व साहित्य क्षेत्रातही नाव मिळवीत आहेत. प्रा.कैलास पवार यांनी अनेकांना घेऊन भूमी फौंडेशनचे कार्य पुढे चालविले हे कौतुकास्पद आहे. यावेळी डॉ बाबुराव उपाध्ये यांनी म.गांधी यांच्या सत्याचे प्रयोग या आत्मचरित्राचा आढावा घेतला व राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे विवेचन केले. अध्यक्षीय भाषणात डॉ पद्मजा गरुड म्हणाल्या म.गांधींचा आदर्श जपत सत्याचे व सत्याने चालणारे राजकारण हेच राष्ट्र समृद्धीचे गमक आहे. हा विचार आचरणात आणला पाहिजे असे सांगून त्यांनी कॅन्सर बाबतची सविस्तर माहिती दिली. प्रत्येकाने वर्षातून एकदा तपासणी करून घ्यावी असे सुचविले. सूत्र संचालन प्रा.सुनील धस यांनी केले व आभार प्रदर्शन प्रा.संजय भिसे यांनी केले.

Related Articles

Back to top button