औरंगाबाद

शेतकरी कष्टकऱ्यांचे प्रश्न सोडावा अन्यथा राजकीय भूमिका घेण्याशिवाय पर्याय नाही- छत्रपती संभाजीराजे

विलास लाटे | पैठण : छावा क्रांतीवीर सेनेचे ८ वे राष्ट्रीय महाअधिवेशन शनिवारी पैठण येथे संपन्न झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले होते तर कार्यक्रमाचे उदघाटक १००८ महामंडलेश्वर शांतीगिरी महाराज यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून माजी मंत्री अर्जून खोतकर, कामगार नेते अभिजित राणे, माजी आ . संजय वाघचौरे, काँग्रेसचे प्रदेश सचिव रविंद्र काळे आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून दीपप्रज्वलन करण्यात आले तसेच शिवसंग्रामचे नेते विनायक मेटेंना श्रध्दांजली वाहण्यात आली.
पुढे बोलतांना संभाजीराजे म्हणाले की माझे जुने सहकारी करण गायकर यांनी स्थापन केलेली ही संघटना त्यांनी अगदी कार्यकर्त्याप्रमाणे राबून राज्यपातळीवर घेऊन गेलेली मी पाहिली आहे. या संघटनेच्या माध्यमातून करण गायकर सारखा एक सामान्य कार्यकर्ता घडताना मी बघितला आहे. त्यामुळे त्यांच्या मागे माझी ताकद उभी करून त्यांना बळ देणे, हे माझे काम आहे. समाजासाठी लढत असताना संघटनात्मक ताकदीचा निश्चितच उपयोग होतो. मराठा आरक्षणासाठी मी २००७ पासून सक्रिय आहे. तेव्हापासून ते यावर्षीच्या सुरूवातीला मराठा समाजाच्या मागण्यांसाठी मी आझाद मैदानावर उपोषण केले, तेव्हापर्यंत अनेक संघटना माझ्या सोबत खंबीरपणे उभ्या राहिल्या. या सर्व संघटनांना एका छताखाली आणून स्वराज्य च्या माध्यमातून सरकारसह प्रस्थापितांवर एक प्रभावी दबावगट निर्माण करणे व समाजाला, शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना त्यांचा न्याय्य हक्क मिळवून देणे, हेच आमचे लक्ष्य आहे. सरकारला आमच्या शेतकरी – कष्टकरी वर्गाचे प्रश्न सोडवावेच लागतील, अन्यथा आम्हालाच राजकीय भूमिका घेण्याशिवाय पर्याय राहणार नाही.
पैठण सारख्या ऐतिहासिक व सांस्कृतिक नगरीकडे दुर्लक्ष होऊ नये. पैठणी सारख्या जगविख्यात साडीची निर्मिती पैठण मध्ये होत असताना, आपल्या तालुक्यातील ज्या उद्योगाला चालना मिळायला हवी, त्याची ख्याती दुसरा तालुका कमावतो हे चुकीचे आहे. आपली ओळख ही आपल्या माध्यमातूनच जगभरात गेली पाहिजे व त्यामाध्यमातून येथील स्थानिक युवकांना रोजगार उपलब्ध झाला पाहिजे. यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधींनी प्रामाणिक प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्याचबरोबर बँकांनीदेखील येथील युवकांच्या पाठीशी भक्कम आर्थिक पाठबळ उभे करण्याची आवश्यकता आहे. यासाठी स्वराज्य संघटना निश्चितच कार्यरत राहील.
माजी मंत्री अर्जुन खोतकर या कार्यक्रम प्रसंगी बोलतांना म्हणाले की या संघटनेची यशस्वी वाटचाल मी गेली अनेक वर्षे बघत आहे,त्यामुळे या अधिवेशनात जे काही ठराव पारित होतील याचा सरकारकडे पाठपुरावा करण्यासाठी मी नेहमी कटिबद्ध असेल. कामगार नेते अभिजित राणे यांनी देखील बोलतांना संघटनेच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तर १००८ प पू महामंडलेश्वर शांतिगिरी महाराज यांनी उपस्थित शेतकरी बंधू बघिणी व संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आशीर्वाद रुपी शुभेच्छा दिल्या. यावेळी जगद्गुरू जनार्दन स्वामी यांच्या जनशताब्दी सोहळ्यानिमित्त बाबाजींनी २२ ऑगस्ट रोजी पाच लक्ष वृक्षारोपण करण्याचा संकल्प केला आहे त्या अनुषंगाने कार्यक्रम स्थळी उपस्थित प्रत्येक व्यक्तीला एक झाड भेट दिले व त्याचे जतन संगोपन करण्याची जबाबदारी दिली.
संघटनेचे संस्थापक करण गायकर यांनी बोलतांना म्हणाले की ज्या वेळी इतर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा उपस्थित झाला सर्व आमदार व खासदार गळा फाडून भाषण करतात. मात्र, मराठा समाजाचा मुद्दा आला की, गप्प बसतात पण आता सहन हे केले जाणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्या पाच मागण्या लवकरच मंजूर कराव्यात नसता, संघटनेच्या वतीने मंत्रालयात घुसून आंदोलन करण्याचा येईल. सरकार कोणाचेही असो माझ्या शेतकरी, कष्टकरी बांधवांचे प्रश्न सुटने महत्वाचे आहे. त्यामुळे जिथे अन्याय अत्याचार होईल त्याचा समाचार हा छावा स्टाईलने घेतला जाईल असा इशारा देखील राज्यकर्त्यांना दिला.
कार्यक्रम प्रसंगी विविध क्षेत्रातील चांगले कामगिरी बजावलेल्या मान्यवरांचा सन्मान चिन्ह देवून गौरव करण्यात आला. या वेळी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष राजेश मोरे, प्रा. उमेश शिंदे यांनीही मनोगत व्यक्त केले. प्रस्ताविक संघटनेचे प्रदेश सरचिटणीस अनिल राऊत यांनी केले तर आभार रामेश्वर बावणे, भगवान सोरमारे, सागर बिराजदार यांनी मानले. या अधिवेशनाप्रसंगी छावा क्रांतिवीर सेनेचे संपूर्ण महाराष्ट्रातील पदाधिकारी व कार्यकर्ते हे हजारोंच्या संख्येने उपस्थित होते. सुत्रसंचलन विजय सुते यांनी केले.

Related Articles

Back to top button