कृषी

तुरीचे शेंडे खुडल्यानंतर उत्पन्नात 15 टक्यांनी वाढ शक्य – डॉ. नंदकुमार कुटे

राहुरी विद्यापीठ : तुरीच्या लागवडीनंतर 45 दिवसांनी वरुन 5 सें. मी. अंतरावर एकदाच जर तुरीचे शेंडे खुडले तर निव्वळ शेेंडे खुडल्यामुळे देखील उत्पन्न 13 ते 15 टक्यांनी वाढते असे प्रतिपादन महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथील कडधान्य सुधार प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कुटे यांनी केले.
कडधान्य सुधार प्रकल्पाच्या वतीने शिराळ व शिंगवे केशव, ता. पाथर्डी येथील शेतकर्यांना हेलीओकील, कामगंध सापळे, हेलिल्यूर व जिब्रालिक ॲसीड या कृषी निविष्ठांचे वितरण करण्यात आले, त्यावेळी उपस्थित शेतकर्यांना मार्गदर्शन डॉ. कुटे बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले की तुरीच्या सुधारीत वाणांची निवड, योग्य वेळी लागवड, दोन ओळी व रोपांमध्ये योग्य अंतर, लागवडीनंतर 45 दिवसांनी एकदाच शेंडे खुडणे, शिफारशीत खतांच्या मात्रांचा अवलंब, पाणी व तणांचे योग्य व्यवस्थापन आणि फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत सुक्ष्म अन्नद्रव्यांची फवारणी केली तर तुरीचे चांगले उत्पन्न वाढते.
यावेळी तूर किटकशास्त्रज्ञ डॉ. चांगदेव वायळ आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की तूरीवर 200 पेक्षा जास्त किडींचा प्रादुर्भाव होत असून आपण जर वेळीच या किडींचे नियंत्रण करु शकलो नाही तर, मात्र 30 ते 40 टक्यापेक्षा जास्त उत्पन्नात घट ही केवळ किडींच्याच प्रादुर्भावामुळे येत असते. त्यामुळे किडींच्या प्रभावी नियंत्रणासाठी लागवडीच्या वेळी 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा/किलो बियाणे या प्रमाणात बिजप्रक्रिया करणे, प्रति हेक्टरी 200 ग्रॅम वरीची लागवड करणे, तुरीच्या लागवडीनंतर 35 दिवसांनी 5 कामगंध सापळे व 50 पक्षीथांबे प्रति हेक्टरी लावणे, पिकाच्या कळी अवस्थेत 5 टक्के निंबोळी अर्काची किंवा 1500 पीपीएम अॅझाडिरेक्टीन 5 मिली/लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करणे, पीक 50 टक्के फुलो-याच्या अवस्थेत असतांना हेलिओकिल (एचएएनपीव्ही) 250 एलई 2 मिली/लिटर पाणी किंवा बॅसिलस थ्युरिनजेनेसीस 2 ग्रॅम/लिटर पाणी आणि यानंतर 15 दिवसांनी इंडोक्झाकार्ब 14.5 टक्के प्रवाही 0.7 मिली किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5 टक्के दाणेदार 0.4 ग्रॅम किंवा क्लोरॅन्ट्रानिलीप्रोल 18.5 टक्के प्रवाही 0.3 मिली/लिटर पाणी या प्रमाणे जर आपण सकाळी लवकर किंवा संध्याकाळी उशिरा फवारणी केली तर मात्र किडींचे आपण प्रभावीपणे नियंत्रण करुन तुरीचे चांगले उत्पन्न घेवू शकतो.
यावेळी तुरीचे रोगशास्त्रज्ञ डॉ. विश्वास चव्हाण यांनी सांगितले की, तुरीवर 10 पेक्षा जास्त रोगांचा प्रादुर्भाव होतो. परंतु यापैकी वांझ रोग व मर रोग या दोन रोगांमुळेच तुरीचे मोठया प्रमाणात नुकसान होत असते. या रोगांच्या नियंत्रणासाठी बिजप्रक्रिया करणे, पिकांची फेरपालट करणे तसेच तुरीचा खोडवा ठेवू नये. वांझ रोगाचा प्रसार हा एरिओफाईड माईट या शुक्ष्म कोळीमुळे होत असल्यामुळे तुरीच्या लागवडीनंतर 20 दिवसांनी आणि 40 दिवसांनी पाण्यात विरघळणारे सल्फर 80 डब्ल्यू. पी. 2.5 ग्रॅम किंवा डायकोफॉल 18.5 ई.सी. 2 मिली किंवा फेनाझॅक्विन 10 ई.सी. 1 मिली/लिटर पाणी या प्रमाणात कोणत्याही कोळी नाशकाची फवारणी करावी. यावेळी कृषी पर्यवेक्षक बाळासाहेब काकडे, शिराळ येथिल प्रगतिशिल शेतकरी सोन्याबापू गोरे, महेश घोरपडे, शेखर आव्हाड, लक्ष्मण आव्हाड व संतोष आव्हाड उपस्थित होते.

Related Articles

Back to top button