अहमदनगर

भारतीय राज्यघटना विविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण – प्रो.डॉ. विलास आवारी

राहुरी / बाळकृष्ण भोसले : भारतीय संविधानकर्त्यांनी राज्यघटना लवचीक अथवा ताठर असे न करता या दोहोंमध्ये सुवर्णमध्य साधलेला आहे. खऱ्या अर्थाने समाजाच्या इच्छा-आकांक्षांचे प्रतिबिंब भारतीय संविधानात उमटलेले दिसते. आपल्या देशामध्ये विविधता आहे. राज्यघटनेची अंमलबजावणी ही तिच्या स्वरूपावर अवलंबून नसते तर ती देशातील जनता व राजकीय पक्ष यावर अवलंबून असते. भारतीय राज्यघटना ही विविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण असल्याचे प्रतिपादन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या राज्यशास्त्र अभ्यास मंडळाचे सदस्य व कोपरगाव कॉलेजचे राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रो. डॉ. विलास आवारी यांनी केले.
तालुक्यातील सात्रळ येथील पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग व अंतर्गत गुणवत्ता हमी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ७१ व्या ‘भारतीय संविधान दिन’ प्रसंगी डॉ. आवारी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो.(डॉ.) सोमनाथ घोलप होते.
अध्यक्षीय भाषणात उपप्राचार्य प्रो. डॉ. सोमनाथ घोलप म्हणाले, भारताची राज्यघटना ही लोकशाहीच्या मार्गाने देशाचा सामाजिक, आर्थिक विकास घडवून आणणे आणि राष्ट्राची एकात्मता बळकट करणे हे ध्येय बाळगून निर्माण केलेली आहे. कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. एकनाथ निर्मळ यांनी प्रास्ताविक केले. याप्रसंग उपप्राचार्य प्रा. दीपक घोलप, प्रो.‌ डॉ. शिवाजी पंडित उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. भाऊसाहेब नवले यांनी केले.

Related Articles

Back to top button