अहमदनगर
भागडा चारी योजनेच्या विज बिलासाठी ४७ लक्ष निधी मंजूर-ना.तनपुरे
राहुरी शहर/अशोक मंडलिक : तालुक्यातील भागडा चारी उपसा जलसिंचन योजनेचे थकीत विद्युत देय्यक भरण्यासाटी जलसंपदा विभागाने ४७ लक्ष २२ रु चा निधी वितरीत केला असल्याची माहिती नगरविकास, उर्जा राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिली.
पश्चिम भागात कणगर, चिंचविहिरे, वडनेर, गणेगाव, तांभेरे, गुहा या गावांसाठी वरदान ठरणा-या भागडा चारी उपसा जलसिंचन योजनेचे विज बिल थकीत होते. यासंदर्भात येथील लाभधारक शेतक-यांनी वेळोवेळी राज्यमंत्री तनपुरे यांच्याकडे मागणी करुन विज बिल भरण्याकामी निधी मिळावा यासाठी आग्रही मागणी केली होती. यावर राज्यमंत्री तनपुरे यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे मागणी करुन सदर योजनेच्या थकीत विज देय्यकासाठी निधीची मागणी केली होती. त्यावर मंत्री पाटील यांनी शासन पातळीवर त्वरीत निर्णय घेवुन ४७ लक्ष २२ हजारांचा निधी भागडा चारीसाठी विद्युत देयक रक्कम भरणेकामी प्राप्त झाला असल्याचे सांगितले.
महाराष्ट्र शासनाच्या झालेल्या निर्णयान्वे उपसा जलसिंचन योजनेच्या वीज देयकांमधील ८१ टक्के वाटा महामंडळास प्राप्त होणा-या बिगर सिंचन पाणीपट्टीतुन भागविण्याबाबत निर्देश प्राप्त झालेले आहेत. त्यानुसार उपसा जलसिंचन योजनांच्या वीज देयकांबाबत निधी मागणी गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळास सादर करतांना ८१ टक्के रक्कमेप्रमाणे निधी मागणी करण्यात यावी असे राज्यमंत्री तनपुरे यांनी सांगितले. हा निधी प्राप्त झाल्याने भागडा चारी उपसा जलसिंचन योजनेचे अध्यक्ष सुयोग नालकर, उपाध्यक्ष विजय नरोडे, सचिव किरण गव्हाणे व परीसरातील लाभ धारक शेतक-यांनी राज्यमंत्री तनपुरे व मंत्री पाटील यांचे आभार व्यक्त केले.