अहमदनगर

राहुरीत मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी चक्काजाम आंदोलन

राहुरी – शुक्रवार दि.१ सप्टेंबर २०२३ रोजी अंतरावली सराटी, जि. जालना येथे मराठा समाजाच्या वतीने शांततेच्या मार्गाने मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषणाचे आंदोलन सुरू होते. परंतु पोलिस प्रशासनाकडून आंदोलनात सहभागी झालेल्या लहान मुले, महिला, वयोवृद्ध यांच्यावर अमानुष लाठी हल्ला करून हवेत अश्रुधूर सोडून हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला. यामुळे राहुरी येथे मराठा एकीकरण समितीने खंडोबा मंदिर येथे बैठक आयोजित केली होती.

अंतरावली सराटी येथील लाठी हल्ला प्रकरणाची सरकारने सखोल चौकशी करून जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई करावी व मराठा समाजाला तात्काळ आरक्षण द्यावे या मागणीसाठी राहुरी कृषी उत्पन्न बाजार समिती समोर नगर मनमाड रोडवर मंगळवार दि.५ सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वा. चक्काजाम आंदोलन करण्याचे ठरवून अशा आशयाचे पत्र राहुरी तहसील कार्यालय आणि पोलिस ठाण्यास देण्यात आले. या आंदोलनात राहुरी तालुक्यातील मराठा बांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन मराठा एकीकरण समितीकडून करण्यात आले आहे.

मराठा एकीकरण समितीच्यावतीने आयोजित बैठकीत आंदोलन संदर्भात चर्चा झाली. राहुरी शहरात विविध सभांमुळे सातत्याने व्यापारी पेठ बंद राहत आहे. या बंदमुळे व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होते, त्यामुळे मराठा आंदोलना दरम्यान राहुरी शहर बंद न करण्याचा एकमुखी निर्णय समितीच्या सदस्यांनी घेतला.

या बैठकीस मराठा एकीकरण समितीचे देवेंद्र लांबे, रवींद्र मोरे, सतीष घुले, सचिन म्हसे, राजेंद्र लबडे, अशोक तनपुरे, मच्छिंद्र गुंड, अनिल आढाव, धनंजय देशमुख, ज्ञानेश्वर सप्रे, दिनेश झावरे, मधुकर घाडगे, रोहित नालकर, बलराज पाटील, महेंद्र उगले, सुजय काळे, अविनाश क्षीरसागर, अशोक कदम, मयुर कल्हापुरे, सचिन शेळके, शरद तनपुरे, अमोल डौले, सचिन लांबे, महेश गटकळ, अमोल लांबे, विकास लांबे, ज्ञानेश्वर धसाळ, माधव लांबे, सुनिल इंगळे, भास्कर मंचरे, मधुकर गागरे, मधुकर सिनारे, उद्धव गागरे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button