पश्चिम महाराष्ट्र
बारामती एमआयडीसीत ५० टक्के भूखंड पडीक; मोठ्या उद्योगासाठी शरद पवारांना साकडे
बारामतीत मोठा उद्योग आणण्यासाठी उद्योजकांच्या शिष्टमंडळाने ज्येष्ठ नेते शरद पवार यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेत साकडे घातले…
पुणे : बारामती परिसरात ऑटोमोबाईल अथवा इंजिनिअरिंग सेक्टर मधला मोठा प्रकल्प येणे आवश्यक आहे. कामाची शाश्वती नसल्याने शेकडो उद्योजकांनी एमआयडीसीकडून भूखंड घेऊन देखील त्याच्यावर उद्योग उभारले नसल्याचे वास्तव आहे. परिणामी, जवळपास ५० टक्के छोटे भूखंड वापराविना पडून आहेत. या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठे उद्योग आणण्यासाठी बारामतीच्या उद्योजकांच्या शिष्टमंडळाने बारामती इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांच्या नेतृत्वाखाली ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेऊन साकडे घातले आहे.
बारामती इंडस्ट्रीयल मॅन्युफॅक्चर्स असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार, सचिव अनंत अवचट, सदस्य महादेव गायकवाड, संभाजी माने, उद्योजक अभिजीत शिंदे, शिवराज जामदार यांनी आज गोविंदबाग येथे ज्येष्ठ नेते पवार यांची त्यांच्या गोविंदबाग निवासस्थानी भेट घेतली. यावेळी उद्योजकांनी विविध बाबी शरद पवार यांच्या निदर्शनास आणून दिल्या.
बारामती एमआयडीसीत पियाजो ही एकमेव वाहन निर्मिती करणारी कंपनी आहे. येथील बहुसंख्य लघुउद्योग या प्रकल्पावर अवलंबून आहेत. या औद्योगिक क्षेत्रात लघुउद्योगांची संख्या लक्षणीय आहे. या सर्वांना पियाजो काम पुरवू शकत नाही. यासाठी स्थानिक लघुउद्योगांना चालना देण्यासाठी बारामतीत आणखी एखादा मोठा वाहन निर्मिती अथवा अभियांत्रिकी प्रकल्प येणे आवश्यक आहे.
सुदैवाने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने कटफळ येथे तीनशे एकर जमीन नुकतीच संपादित केली आहे. या विस्तारित जागेवर ऑटोमोबाईल अथवा इंजिनिअरिंग सेक्टरमधील मोठा प्रकल्प आणण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत, अशी विनंती उद्योजकांनी केली आहे.
असोसिएशनने केलेली सूचना योग्य असून याबाबत सकारात्मक विचार केला जाईल, अशी ग्वाही पवार साहेबांनी शिष्टमंडळास दिली असल्याचे जामदार यांनी सांगितले.