गुन्हे वार्ता

बारागाव नांदूर मध्ये चोरट्यांचा धुमाकूळ !!

बारागाव नांदूर : राहुरी तालुक्यातील सधन असलेल्या बारागाव नांदूर मध्ये विविध अवैध धंदे सुरू असतानाच गावामध्ये चोरट्यांनी थैमान घातले आहे. शेतकऱ्यांना सर्वाधिक त्रास दिला जात असुन शेतात उभा असलेला शेतमाल चोरणे, शेतातील ठिबक पाइपलाइन, वीज पंप व केबल चोरून नेण्याच्या अनेक घटना घडतच आहे. वाळु चोरी केल्यानंतर शेतकऱ्यांचे नुकसान करणे, दुचाकी चोरून सेटलमेंट करायचे प्रकार घडत आहेत. याबाबत त्रस्त झालेल्या ग्रामस्थांनी चोरट्यांचा बंदोबस्त करण्याच्या मागणीसाठी दि. २१ सप्टेंबर २०२१ रोजी सकाळी ११:०० वा. ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन केले आहे.

ग्रामपंचायत कार्यालया ठिकाणी ग्रामस्थांनी रुद्रावतार घेत चोरट्यांचा बंदोबस्त करा, असे म्हटल्यावर ग्रामस्थांचा संताप पाहता पोलीस निरीक्षक राजेंद्र इंगळे,पोलीस उपनिरीक्षक निरज बोकील यांसह पोलिस पथकाने ग्रामपंचायत कार्यालयासमोर हजर होत ग्रामस्थांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. यावेळी ग्रामस्थांनी गावातील दुष्कृत्य व गुन्हेगारीची सविस्तर माहिती पोलिस निरीक्षकांना दिली आहे. पोलीस निरीक्षक इंगळे यांनी सांगितलं की, जो चोरट्यांचा धुमाकूळ आहे त्याचं काहीही त्रास जनतेला झाला नागरिकांना झाला तर कोणत्याही वेळी कॉल करा तिथे पोलीस गाडी येईल. यावेळी तरुण, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या चोरांना नेमके कोणाचे पाठबळ आहे? अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये चालु आहे. चोरट्यांच्या धुमाकूळामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस निरीक्षक इंगळे साहेब यांनी आश्वासन दिल्याने ग्रामस्थांना काहीसा दिलासा मिळाला आहे. तरीही गावातील पोलीस पाटील, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामसेवक, नेतेमंडळी यांनी या प्रकाराकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया ग्रामस्थांनी दिल्या आहेत.

Related Articles

Back to top button