अहमदनगर
पुस्तक वाचनामुळे दुःखी जीवन सुखी होते-सौ. अनसूया सोनसळे
श्रीरामपूर (बाबासाहेब चेडे ) : पुस्तके वाचनाची मला बालपणापासून आवड आहे, माणसाचं जीवन सुख दुःखाने भरलेलं आहे, मी वृद्धाश्रमात अनेक पुस्तके वाचून समाधान शोधले. गरिबी आणि दुःख ह्या जीवनातल्या वेदना आहेत. पण वाचनामुळे दुःखी मन सुखी होते, असे भावपूर्ण उदगार सौ. अनसूया गेनूजी सोनसळे यांनी काढले.
येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानतर्फे वृद्धाश्रमातील सौ. अनसूया सोनसळे यांचा शेकडो पुस्तके वाचल्याबद्दल सौ. मंदाकिनी उपाध्ये यांनी सत्कार केला. डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी “फिरत्या चाकावरती “, “संतसाहित्य :शोध आणि बोध “,” आयुष्याच्या वळणावर “आदी पुस्तके देऊन सौ. सोनसळे यांचे स्वागत करून सत्कार केला. तसेच रिक्षाचालक नंदकिशोर धनवटे यांनाही पुस्तके देऊन सन्मान केला. श्रीमती लक्ष्मीबाई उपाध्ये यांनीही सौ.सोनसळे यांचे कौतुक केले. इतक्या वृद्धपणात चष्मा न लावता भरभर वाचता येते त्याबद्दल अभिनंदन केले. सौ. मंदाकिनी उपाध्ये यांनी आपल्या कुंभारवाड्यातील जुन्या आठवणी सांगत ‘फिरत्या चाकावरती “आत्मकथन वाचल्याबद्दल सौ. सोनसळे आजीचे आभार मानले. सौ. सोनसळे यांनी वृद्धाश्रमाचे प्रमुख सुभाष वाघुंडे यांच्यावरील कविता सादर केली, सुभाषराव वाघुंडे म्हणजे भला माणूस असल्याबद्दल कौतुक केले, त्यांच्यामुळेच मला बरीच पुस्तके वाचण्यास मिळतात आणि डॉ. बाबुराव उपाध्ये हे आम्हाला खूप पुस्तके देतात असे गौरव उदगार त्यांनी काढले.
डॉ. उपाध्ये यांनी सांगितले की, आजचे वृद्ध स्त्री, पुरुष पुस्तक वाचनातून समाधान शोधतात तर युवकांनी आजच्या स्पर्धेच्या युगात पुस्तके वाचनातून ज्ञान आणि
समाधान शोधावे, संस्कृती आणि माणसं समजून घ्यावेत असे आवाहन करून आभार मानले.