अहमदनगर
पीक पाहणी ऑफलाईन करा पिपल्स रिपाईची महसूलमंत्र्यांकडे मागणी
चिंचोली/बाळकृष्ण भोसले : शासनाने जाहीर केलेल्या पीक पाहणीचा उपक्रम चांगला आहे परंतु अहमदनगर जिल्ह्यात सर्वच तालुक्यांमध्ये पाऊस जास्त झाल्याने शेतकऱ्यांना शेतात पाणी साचल्याने पिक पाहणी करणे अवघड झाले आहेे. त्यामुळे महसूल विभागाने २०२०-२१ ची पीक पाहणी ऑनलाइन ऐवजी ऑफलाइन करावी अशी मागणी मा. खा. प्रा. जोगेंद्र कवाडे प्रणित पीपल्स रिपब्लिकन पार्टीने निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे.
शेतकरी वर्ग हा सर्वसामान्य आहे. प्रत्येक शेतकर्यांकडे अँन्ड्राइड मोबाईल आहे असे नाही. ५० टक्क्यावर शेतकऱ्याकडे साधे फोन असून बऱ्याच शेतकऱ्यांना ऑनलाइन मोबाईलचे प्रशिक्षण नाही. त्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी अद्याप पीक पाहणीच लावली नाही. त्यामुळे शेतकरी शासकीय योजनेपासून वंचित राहील. त्यामुळे महसूल विभागाने स्वतंत्र आदेश काढून आपल्या विभागामार्फत येत्या आठवड्यामध्ये शेतामध्ये उभे पीक असेल त्याचा पंचनामा करून पिक पाहणी लावून शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी ऑफलाईन पीकपाणी लावावी अशी मागणी रिपब्लिकन पक्षाच्या शिष्टमंडळाने निवेदनाद्वारे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांच्याकडे केली आहे.
सदर निवेदनावर ज्येष्ठ नेते संपतराव भारुड, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष किशोर वाघमारे, जिल्हाध्यक्ष सुमेध गायकवाड, युवक अध्यक्ष अतुल भिंगारदिवे, जिल्हा महिला आघाडी प्रमुख गौतमीताई भिंगारदिवे, शहराध्यक्ष महेश भोसले, संगमनेर तालुकाध्यक्ष जालिंदर बोरुडे, युवा अध्यक्ष गौतम रोहम, महिला आघाडी प्रमुख अनिताताई वाघमारे आदी कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.