औरंगाबाद

पाचोड परिसरात अवैध दारू धंदा जोरात, पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष

 
विजय चिडे/पाचोड : पाचोडसह परिसरात अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री जोमात सुरू आहे. याकडे स्थानिक पोलिस प्रशासन कानाडोळा करत असल्यामुळे नागरिकांत असंतोषाचे वातावरण पसरले आहे. पाचोड पोलीस ठाण्याच्या परिसरात अवैध धंदे जोरात सुरू असल्याने नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. थातूरमातूर कारवाई करून मात्र पोलीस यामधून आपली पाठ थोपटून घेण्यामध्ये मग्न असल्याचे चित्र या परिसरातील नागरिकांना अनुभवायला मिळत असल्याची चर्चा नागरिकांत आहे.

पाचोड हे पैठण तालुक्यातील सर्वात महत्वाचे आणि मोठी बाजारपेठ म्हणून ओळखले जाणारे गाव आहे. याठिकाणी पोलीस स्टेशन असून या पोलीस स्टेशन अंतर्गत परिसरात जवळपास 78  गाव तांडे वस्त्या आहे. पाचोड, विहामांडवा, आडुळ आदी ठिकाणी अधिकृत देशी दारूच्या दुकाना आहेत. मात्र, तरीही अवैधरीत्या देशी दारूचा धंदा पाचोड पोलिसांच्या आशीर्वादाने जोरात सुरू आहे. पाचोड, दावरवाडी, लिंबगाव, कडेठाण, दाभरूळ तांडा, कोळीबोडखा, वडजी, ब्राह्मणगाव, एकतुनी, राजापूर, थापटी तांडा, थेरगाव आदी ठिकाणी अवैधरित्या देशी दारूचा धंदा जोरात सुरू असल्याने, यामुळे सामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दारूच्या नशा पोटी अनेक महिला आपल्या पती पासून त्रस्त झाल्याचे चित्र पहायला मिळत आहे. तर अनेक गावातील महिलांनी या अगोदरही देशी दारूची अवैधरित्या चालणाऱ्या दुकाना बंद करण्याच्या तक्रारी पोलिसांकडे केल्याचे महिलांकडून सांगितले जात आहे.

मात्र या धंद्यावर पाचोड पोलीस कुठलीही ठोस कारवाई करत नसल्याने हे धंदे फोफावल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे. आठ पंधरा दिवसातुन एखादी कारवाई रेकॉर्ड मेण्टेन करण्यासाठी थातूरमातूर पद्धतीने हजार-दोन हजार रुपयाच्या मुद्देमाल जप्त करून केली जाते. कारवाई झाल्यानंतर पुन्हा अवैध देशी विक्रेत्याला अशा पद्धतीने विकू नको असाही सल्ला देऊन “तुम्हारी चूप, हमारी भी किसी को कुछ मालूम नही” असे म्हणत तू तुझं हिशोबाने चालू दे असं म्हणत पुन्हा त्याला जोमाने या धंद्यामध्ये उतरवत असल्याच्या प्रतिक्रिया सामान्य वर्गातून समोर येत आहेत. मात्र या सर्व प्रकारावर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष घालून पाचोड परिसरातील अवैध देशी दारूचा गोरख धंद्यावर आळा घालण्यासाठी कार्यवाही करावी अशी मागणी आता सामान्य नागरिक व महिला वर्गातून होत आहे.सकाळी सहा वाजल्यापासून अवैध देशी दारू विक्रीला सुरुवात होते. पाचोड पोलीस स्टेशन अंतर्गत सुमारे तीन सरकारमान्य देशी दारूची दुकानं आहेत. मात्र अवैधरित्या देशी दारू विक्रीची सकाळी सहा वाजल्या पासूनच सुरू होत असल्याने याविषयी सामान्य नागरिकांमध्ये पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

दारू विक्री करणार्‍यांची दहशत असल्यामुळे त्यांच्या विरोधात तक्रार करण्यास सर्वसामान्य नागरिक धजावत नाही. यामुळे दारू विक्रीचा हा व्यवसाय खुलेआम सुरू आहे. शिवाय अनेक हॉटेलात रात्री उशिरापर्यंत दारूची विक्री करण्यात येते. दारू विक्रेत्यांकडून ‘मलिदा’ मिळत असल्यामुळे त्यांच्यावर कारवाई करण्यात प्रशासन कानाडोळा करीत असल्याचा आरोप नागरिकांतून केला जात आहे. दरम्यान येथील नागरिकांतून गावातील अवैध दारू विक्री थांबविण्यात यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.

Krantinama Team

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक,क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button