अहमदनगर

नेतृत्व गुण व ध्येयवादी असणे हीच यशस्वी आर्मी ऑफिसर होण्याची गुरुकिल्ली- कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील

कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्रसेनेद्वारे ऑनलाईन वेबीनारचे आयोजन
अहमदनगर/ जावेद शेख : राष्ट्रीय छात्र सेनेची शिकवन ही फक्त तीन वर्षाकरीता नसुन आयुष्याची शिदोरी आहे. दैनंदिन जीवनात एन. सी. सी. मुळे एक उत्साह व शिस्तबध्दता येते. प्रत्येक प्रश्नाकडे पाहण्याचा तुमचा दृष्टीकोन कसा आहे यावर तुमचे यश अवलंबून आहे. नेतृत्व गुण व ध्येयवादी असणे हीच यशस्वी आर्मी ऑफिसर होण्याचे गुरुकिल्ली आहे असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. पी. जी. पाटील यांनी केले.
महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील डॉ. अण्णासाहेब शिंदे कृषि अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेच्या सहकार्याने सर्व्हीस सिलेक्शन बोर्डाची परिक्षा कशी पार पाडायची या विषयावरील ऑनलाईन वेबीनारचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय छात्र सेनेच्या 73 व्या स्थापना दिवसाचे औचित्य साधुन या वेबीनार आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन कुलगुरु डॉ. पी.जी. पाटील बोलत होते. याप्रसंगी निवृत्त ब्रिगेडीयर डॉ. सुनिल बोधे प्रमुख मार्गदर्शक म्हणुन ऑनलाईन उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन महाराष्ट्र राष्ट्रीय छात्र सेना संचालनालयाचे अतिरिक्त संचालक ले.कर्नल एस.डी. हांगे हे ऑनलाईन उपस्थित होते. कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. दिलीप पवार उपस्थित होते.
निवृत्त ब्रिगेडीयर डॉ. सुनिल बोधे आपल्या मार्गदर्शनात म्हणाले की सर्व्हीस सिलेक्शन बोर्डाची परिक्षा देण्यासाठी प्रत्येक छात्राने स्वतः मधील उणीवा व स्वतः बलस्थाने कोणती आहेत याचा अभ्यास केला पाहिजे. तुमची विचार करण्याची पध्दत, तुमची वागणुक, समस्येला तोंड देण्याची तुमची क्षमता यावर तुमचे यश अवलंबून आहे. त्यासाठी स्वतःला समजुन घेणे, मेंदूचा वापर करुन प्रश्न समजुन घेणे, त्याचे पृथःकरण करणे या गोष्टी प्रशिक्षणाशिवाय शक्य नाहीत. यशस्वी आर्मी ऑफिसर होण्यासाठी छात्रांमध्ये नेवृत्वगुण, विचारकौशल्य व व्यक्तीमत्व विकास यांची सांगड अतिशय महत्वची आहे. संवाद कौशल्यामध्ये शब्द, भाषा प्राविण्य व हावभाव यांचा ताळमेळ बसविणे अत्यंत गरजेचे आहे. ज्ञान व अनुभवाने आत्मविश्वास येवून विद्यार्थ्यांच्या अंगी चांगले नेतृत्वगुण येवू शकतात. यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करणे गरजेचे आहे.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ले.कर्नल एस.डी. हांगे म्हणाले की राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांना मिलिटरी तसेच पॅरा मिलिटरी सर्व्हीसेसमध्ये नोकरीच्या भरपूर संधी उपलब्ध आहेत. छात्रामध्ये दृष्टीकोन, आवड, ध्येयवादी आणि निर्धारक असणे हीच आर्मी ऑफिसर होण्याची गुरुकिल्ली आहे. छात्रांनी स्वतःच्या क्षमतांचा विकास करुन योग्य ध्येय निश्चित केले तर त्यांना यशस्वी होण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही.
कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता व वेबीनारचे निमंत्रक डॉ. दिलीप पवार यांनी या वेबीनारच्या आयोजनाविषयी माहिती दिली. प्रमुख पाहुण्यांचे स्वागत व आभार कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या राष्ट्रीय छात्र सेनेचे अधिकारी ले. डॉ. सुनिल फुलसावंगे यांनी मानले. या वेबीनारचे सहनिमंत्रक कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थी परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. अतुल अत्रे हे होते. वेबीनारचे आयोजन सचिव डॉ. सुनिल फुलसावंगे तर सहसचिव कृषि अभियांत्रिकी महाविद्यालयाचे सहा. प्राध्यापक डॉ. अवधुत वाळुंज हे होते. या वेबीनारसाठी शंभरपेक्षा जास्त छात्र ऑनलाईन उपस्थित होते.

Related Articles

Back to top button