सामाजिक
देवळाली प्रवरातील कोरोना विधवा भगिनींना साडी चोळी आणि फराळ देऊन भाऊबीज साजरी
कोरोना विधवा भगिनींच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू – आप्पासाहेब ढुस
देवळाली प्रवरा : कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती व देवळाली हेल्प टीमने दिवाळी भाऊबीज निमित्ताने देवळाली प्रवरा मधील ३० कोरोना विधवा भगिनींना साडी चोळी आणि दिवाळी फराळ देऊन भाऊबीज साजरी केली. त्या प्रसंगी या माय भगिनिंच्या डोळ्यातील अश्रू पाहून नकळत डोळ्यांच्या कडा ओळवल्याची भावना आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राहुरी तालुका समन्वयक आप्पासाहेब ढुस यांनी व्यक्त केली, व कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती आणि देवळाली हेल्प टीम सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे सांगून या भगिनींना धीर दिला.
देवळाली प्रवरा हद्दीतील कोरोना विधवा भगिनींसोबत भाऊबीज साजरी करून त्यांचे मनोबल वाढविनेचा मानस कोरोना एकल महिला पुनर्वसन समितीचे राहुरी तालुका समन्वयक तथा देवळाली हेल्प टीम चे सदस्य आप्पासाहेब ढुस व प्रशांत कराळे यांनी व्यक्त करताच राहुरी फॅक्टरी परिसरातील दानशूर व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिद्ध असलेले साई आदर्श मल्टिस्टेट संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजीराव कपाळे यांनी देवळाली प्रवरा हद्दीतील सर्व कोरोना विधवा महिलांना भाऊबीज निमित्ताने साडी चोळी भेट देण्याचे मान्य करून तात्काळ साड्या दिल्या.
त्याच पद्धतीने देवळाली प्रवरा येथील ब्रह्मकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या संचालिका विजया दिदी यांनी या सर्व भगिनींना फराळ देण्याचे तात्काळ मान्य करून फराळ दिले.
कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती आणि देवळाली हेल्प टीमच्या आव्हानाला तात्काळ प्रतिसाद देऊन साई आदर्शचे शिवाजीराव कपाळे आणि देवळाली प्रवरा येथील ओम शांती केंद्राच्या विजया दिदी यांनी देवळाली प्रवरा हद्दीतील ३० कोरोना विधवा भगिनींना देणेसाठी साडी चोळी आणि फराळ देऊन या भगिनींची दिवाळी भाऊबीज गोड करण्यास व त्यांना धीर देण्यास मदत करून समाजा समोर आदर्श निर्माण केला. त्या बद्दल आप्पासाहेब ढुस व प्रशांत कराळे यांनी साई आदर्श चे चेअरमन शिवाजीराव कपाळे व देवळाली प्रवरा ओम शांती केंद्राच्या विजया दीदी यांचे आभार व्यक्त केले.
पुढे बोलताना आप्पासाहेब ढुस यांनी सांगितले की, कोरोना एकल समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी, जिल्हा सन्वयक अशोक कुटे आणि मानिषाताई कोकाटे यांचे मार्गदर्शनाखाली राहुरी तालुक्यातील सर्व कोरोना विधवा भगिनींच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे असून तालुक्यातील या महिलांच्या जवळपास १७५ मुलांना महिला व बाल विकास विभागा मार्फत अकराशे रुपये प्रतिमाहची बालसंगोपन योजना लागू करण्यास सहकार्य केले असून कोरोनाने किंवा इतर कारणाने पालक गमावलेल्या १८ वर्षे वयाचे आतील तालुक्यातील १००% बालकांना बालसंगोपन योजना लागू करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहणार असून विधवा भागीनींना सर्व प्रकारच्या शासकीय मदत मिळवून देण्यासाठी कोरोना एकल महिला पुनर्वसन समिती आणि देवळाली हेल्प टीम सर्वतोपरी प्रयत्न करीत असल्याचे आप्पासाहेब ढुस यांनी सांगितले.