कृषी

तुरीचे एकरी 14 क्विंटल उत्पादन घेणे शक्य- डॉ. नंदकुमार कुटे

राहुरी विद्यापीठ प्रतिनिधीकृषि विद्यापीठाने प्रसारीत केलेल्या सुधारीत वाणांचा, शिफारशींचा व सुधारीत तंत्रज्ञानाचा वापर करुन तुरीची लागवड, व्यवस्थापन व जोपासना केली तर तुरीसारख्या पिकाचे सुध्दा एकरी 14 क्विंटलपर्यंत उत्पन्न घेणे शक्य आहे असे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथील कडधान्य सुधार प्रकल्पाचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. नंदकुमार कुटे यांनी केले.

मु.पो. शिराळ व शिंगवे केशव ता. पाथर्डी येथे कृषि विद्यापीठ, राहुरी व कृषि विभाग, महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत केलेल्या शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची बैठक व शेतकर्यांची शेती शाळा या संयुक्त कार्यक्रमात शेतकर्यांना मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. यावेळी ते पुढे म्हणाले की बिजप्रक्रिया करुनच तुरीची लागवड करावी. लागवडीनंतर 45 दिवसांनी शेंडे खुडावेत. फुलोरा व शेंगा भरण्याच्या अवस्थेत संरक्षीत पाणी द्यावे वेळेवर आंतरमशागत करुन तण व्यवस्थापन करावे. पीक फुलोर्यात असतांना दोन टक्के युरीयाची आणि शेंगा भरण्याच्या अवस्थेत असतांना दोन टक्के पोटॅशची फवारणी करावी आणि किडी व रोगांचे वेळीच नियंत्रण करावे अशा पध्दतीने जर आपण तुरीची लागवड व जोपासणा केली तर तुरीचे 14 क्विंटलपर्यंत उत्पादन घेणे शक्य होते.
तुर किटकशास्त्रज्ञ डॉ. चांगदेव वायाळ यांनी मार्गदर्शन करतांना सांगितले की तुरीवर दोनशेपेक्षा जास्त किडींचा प्रादुर्भाव होत असल्याची नोंद आढळुन आलेली आहे. परंतु या पिकाचे सर्वात जास्त नुकसान शेंगा पोखरणार्या अळीवर्गीय किडींमुळे होत असते आणि त्यांची संख्या ही फक्त चार ते पाच एवढीच आहे. त्यांच्या प्रभावी नियंत्रणासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापन पध्दतीचा अवलंब करण्यात येवून पीक कळी अवस्थेमध्ये असतांना पाच टक्के निंबोळी अर्काची किंवा अॅझाडिरेक्टीन 300 पीपीएम पाच मिली प्रति लिटर पाणी या प्रमाणात फवारणी करावी. पीक 50 टक्के फुलोर्याच्या अवस्थेत असतांना एच.ए.एन.पी.व्ही. 250 एल.ई. 2.0 मिली प्रति लिटर पाणी या जैविक किडनाशकाची किंवा बॅसिलस थ्युरिनजेनेसीसची 2.0 ग्रॅम प्रति लिटर पाण्यात या प्रमाणात फवारणी करावी. पीक शेंगा भरण्याच्या अवस्थेत असतांना इंडाक्झाकार्ब 14.5 एस.सी.0.7 मिली प्रति लिटर पाणी किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5 एस.जी. 0.4 ग्रॅम प्रति लिटर किंवा क्विनालफॉस 25 इ.सी. 2.0 मिली प्रति लिटर पाणी किंवा क्लोरॅट्रानिलीप्रोल 18.5 एस.सी. 0.3 मिली प्रति लिटर पाणी यापैकी कुठल्याही किडनाशकांची सकाळी लवकर फवारणी करावी.

यावेळी कडधान्य सुधार प्रकल्पाचे रोगशास्त्रज्ञ डॉ. विश्वास चव्हाण यांनी रोगनियंत्रणाबाबत माहिती दिली. कृषि पर्यवेक्षक बाळासाहेब काकडे यांनी कृषि विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या शेती शाळेची शेतकर्यांना सविस्तर माहिती देवून 50 शेतकर्यांना कामगंध सापळे व ल्यूरचे वाटप केले. याप्रसंगी कडधान्य सुधार प्रकल्पाच्या वतीने 28 शेतकर्यांना कामगंध सापळे, ल्यूर, कृषिदर्शनी, सूक्ष्म अन्नद्रव्ये ग्रेड-2 यांचे वितरण करण्यात आले. यावेळी शेतकर्यांनी राबविलेल्यातूर आद्यरेखा प्रात्यक्षिकांची संयुक्तपणे पाहणी करण्यात आली. याप्रसंगी कृषि सहाय्यक गणेश धोंडे व शिराळ आणि शिंगवे केशव या गावामधील तूर उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक कृषि सहाय्यक जयदिप खळेकर यांनी केले तर आभार कृषि सहाय्यक राहुल आठरे यांनी मानले.

Related Articles

Back to top button