अहमदनगर

महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाचे अग्रदूत पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील – प्रा. एकनाथ निर्मळ

चिंचोली प्रतिनिधी : देशाच्या जडणघडणीत ज्या युगपुरुषांचे योगदान लाभले आहे, त्यात सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांचे स्थान फार वरचे आहे. शेतकरी कुटुंबात जन्मलेले विठ्ठलराव अंगभूत गुणांच्या जोरावर ग्रामीण परिसराचा सर्वांगीण कायापालट करतात. त्यांनी‌ अज्ञान, अंधश्रद्धा, दारिद्र्याने गांजलेल्या व दुष्काळाने पिडलेल्या शेतकऱ्यांचे प्रबोधन केले. शेतकऱ्यांच्या दारिद्र्यास दुष्काळ आणि सावकार हे कारणीभूत आहेत, हे ओळखून त्यांनी सहकारी पतपेढी स्थापन केली. प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेची स्थापना करीत समाजातील सर्वांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली म्हणून महाराष्ट्राच्या ग्रामीण विकासाचे अग्रदूत पद्मश्री ठरतात, असे मत प्रतिपादन सात्रळ महाविद्यालयाचे राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा.एकनाथ निर्मळ यांनी केले.

     लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील ( पद्मभूषण उपाधिने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सात्रळ येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात उत्सव समितीच्या वतीने सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांची १२१ वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी पंचक्रोशीतील प्रगतिशील शेतकऱ्यांना महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागाने परिश्रम घेऊन तयार केलेली औषधी वनस्पतींची रोपे भेट देऊन सर्व शेतकरी बांधवांना शेतकरी दिनानिमित्त महाविद्यालयाच्या वतीने हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
     कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष ॲड.श्री.बाळकृष्ण पाटील चोरमुंगे हे होते. याप्रसंगी पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मा. विश्वासराव कडू पाटील, कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कारभारी ताठे पाटील,संचालक बाबुराव पलघडमल, जे.पी. जोर्वेकर, पाराजी धनवट, प्रवरा बँकेचे माजी संचालक रमेश पन्हाळे, मुळा प्रवरा संस्थेचे संचालक मच्छिंद्र अंत्रे, धानोरे गावचे सरपंच ज्ञानदेव दिघे पाटील, पोलीस पाटील रंगनाथ दिघे पाटील, पंचक्रोशीतील प्रगतशील शेतकरी वसंतराव पाटील, खंडू लक्ष्मण दिघे पाटील, महाविद्यालयाचे प्र. प्राचार्य प्रो.डाॅ. सोमनाथ घोलप, उपप्राचार्य प्रा.दीपक घोलप, कार्यालयीन अधिक्षक  विलास शिंदे, महेंद्र तांबे आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांना महाविद्यालयात तयार करण्यात आलेल्या गुळवेल (गिलोय) या औषधी वनस्पतींची रोपे भेट देऊन सत्कार करण्यात आला.
      कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रो. डॉ. सोमनाथ घोलप म्हणाले, स्वतः ऊन घेऊन समाजाला सावली देणारे व्यक्तिमत्व म्हणजे पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील होत. पद्मश्रींच्या यशाच्या प्रत्येक पायऱ्या या शेतकऱ्यांच्या विकासाच्या गाथा आहेत. पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील हे एकात्मिक ग्रामीण विकासाचे आद्य प्रवर्तक आहेत. अध्यक्षीय भाषणात ॲड. बाळकृष्ण पाटील चोरमुंगे म्हणाले, पद्मश्रींनी शिक्षण संस्था सुरू केल्यामुळे ग्रामीण भागातील मुले शिकून मोठी झाली. उच्च पदावर गेली. सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागात पद्मश्रींनी प्रचंड मोठे कार्य उभे केले आहे.पद्मश्रींचा साधेपणा पाहिला की आपणास आश्चर्य वाटते. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी असणारे हे व्यक्तिमत्व आम्हा सर्वांचे आराध्य दैवत आहे. याप्रसंगी बोलताना पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष मा. विश्वासराव कडू पाटील म्हणाले,पद्मश्रींनी पहिला सहकारी साखर कारखाना निर्माण केला परंतु अध्यक्ष धनंजयराव गाडगीळ यांना केले. पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील यांना परिसरात आदराने ‘अप्पा’ म्हणत. अप्पा आयुष्यभर शेतकऱ्यांच्याच वेषात वावरले आणि त्यांच्याच भाषेत बोलले;त्यामुळे गरीब शेतकऱ्यांना ते सदैव आपलेच वाटले.
     कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाविद्यालयातील उत्सव समितीचे चेअरमन प्रो.डॉ. शिवाजी पंडित, प्रा.डाॅ. रामदास बोरसे, प्रा. दीनकर घाणे, प्रा.वैभव दिघे, प्रा.आदिनाथ दरंदले, डॉ.नवनाथ शिंदे, सुखदेव पवार, रमेश डोखे, संजय तुपे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. दीप्ती आगरकर व प्रा. विनोद पलघडमल यांनी केले. प्रा.डॉ.गोरक्षनाथ बोर्डे यांनी आभार मानले.

Related Articles

Back to top button