अहमदनगर

डॉ.विनायक मोरगे यांनी शिक्षकांचे केलेले सन्मान आदर्शवत – डॉ. बाबुराव उपाध्ये

श्रीरामपूर | बाबासाहेब चेडे : श्रीरामपूर भूषण असलेले डॉ. विनायक मोरगे यांनी आपल्या शिक्षकांचे ‘ शिक्षक कृतज्ञता पुरस्कार ‘ देऊन सन्मानपूर्वक केलेले ‘गुरुदक्षिणारूप सत्कार आजच्या युगात आदर्शवत असल्याचे मत जेष्ठ साहित्यिक आणि रयत शिक्षण संस्थेचे माजी मॅनेजिंग कौन्सिल सदस्य डॉ.बाबुराव उपाध्ये यांनी व्यक्त केले.
येथील स्वयंवर मंगल कार्यालयात डॉ.विनायक मोरगे यांनीअशोकनगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या अशोक माध्यमिक विद्यालयातील शिक्षकांचा शिक्षक कृतज्ञता सोहळा आयोजित करण्यात आला होता, त्याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ.बाबुराव उपाध्ये बोलत होते. अध्यक्षस्थानी अशोकनगर येथील अशोक माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक निवृत्ती पठारे उपस्थित होते.प्रारंभी श्रीसरस्वतीमाता प्रतिमापूजन करून, पदमभूषण डॉ.कर्मवीर भाऊराव पाटील यांना अभिवादन करण्यात आले. व्यासपीठावर डॉ.विनायक मोरगे यांच्या मातोश्री प्रमिला भाऊसाहेब मोरगे, डॉ. विनायक मोरगे, श्रीमती सुनंदा शिंदे, चांगदेव कडू, गोरक्षनाथ उंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. विनायक मोरगे आणि डॉ.सरोज मोरगे यांनी मातोश्री प्रमिला मोरगे यांचा प्रथम मातृपूजनात्मक सत्कार केला. डॉ.विनायक मोरगे यांनी 1992 ते 1998 या काळात अशोकनगर येथील अशोक माध्यमिक विद्यालयात शिक्षण घेतले. त्या कठीण काळात शिक्षकांनी आधार आणि आकार दिला, ही कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी डॉ.विनायक मोरगे डॉ.सरोज मोरगे, डॉ.ज्ञानेश्वर मोरगे परिवाराने शिक्षक, शिक्षिकांचा ‘शिक्षक कृतज्ञता पुरस्कार’ सन्मानचिन्ह, बुके, शाल, भेटवस्तू, वृक्षरोप, डॉ.बाबुराव उपाध्ये लिखित “समाजचिंतन’, ‘माय मराठी शिदोरी’ ही पुस्तके देऊन सत्कार केले.
डॉ. विनायक मोरगे यांनी स्वागत,प्रास्ताविक केले.त्यांनी आणि डॉ.सौ.सरोज मोरगे यांनी उपस्थित 22 शिक्षक, शिक्षिकांचा सत्कार केला. प्रमुख पाहुणे डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी डॉ. मोरगे यांच्या अशा आगळ्या वेगळ्या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, श्रीरामपूरच्या 75 वर्षाच्या इतिहासात असा कार्यक्रम प्रथमच झाला. डॉ. विनायक मोरगे यांनी रयत शिक्षण संस्थेतील शिक्षकांचा भव्यदिव्य सोहळ्यात कृतज्ञता पुरस्कार देऊन केलेले सत्कार म्हणजे आधुनिक युगातील प्रेरणादायी गुरुदक्षिणा आहे. डॉ. विनायक मोरगे म्हणजे श्रीरामपूरच्या वैद्यकीय क्षेत्रातील सेवाभावी, तज्ञ, संस्कारशील, लोकप्रिय आणि नम्र व्यक्तिमत्व आहे. त्यांनी कोविड काळात दाखविलेले धैर्य आणि कौशल्य भूषणावह आहे, म्हणूनच श्रीरामपूर नगर परिषदेने त्यांचा ‘श्रीरामपूर भूषण पुरस्कार ‘ देऊन केलेला सन्मान ही त्यांच्या वैद्यकीय सेवाभावाची पोचपावतीच आहे, असे सांगून डॉ. बाबुराव उपाध्ये यांनी आपले जीवन अनुभव सांगितले. अध्यक्ष मुख्याध्यापक निवृत्ती पठारे, प्राचार्य संपतराव देसाई, सोपानराव नाईक, श्याम सारंगधर यांनी आपल्या मनोगतातून डॉ. विनायक मोरगे यांच्याप्रती अनेक गुणात्मक आठवणी सांगून असे आदर्श विद्यार्थी हीच खरी आमची श्रीमंती आहे. कोविड योद्धा असलेल्या डॉ. मोरगे परिवाराचे सर्वांनी कौतुक केले. सूत्रसंचालन ग्रामीण रुग्णालयातील प्रसन्न धुमाळ यांनी केले. डॉ.विनायक मोरगे यांनी असे आदर्श शिक्षक सर्वांना लाभले पाहिजेत, शिक्षक हेच माझ्या जीवनाचे शिल्पकार आहेत, विद्यार्थ्यांनी आपल्या गुरुविषयी नेहमी कृतज्ञ राहून समाजात नावारूला आले पाहिजे, हाच शिक्षकाचा खरा सन्मान असल्याचेही त्यांनी सांगून अशोकनगरच्या आठवणी विशद केल्या, उपस्थित असलेल्या शिक्षकांनी स्नेहभोजन आणि मोरगे हॉस्पिटल पाहणी करताना आनंद व्यक्त केला. याप्रती समारोप करीत डॉ. विनायक मोरगे यांनी आभार मानले.

Related Articles

Back to top button