अहमदनगर
डॉ. बाबुराव उपाध्ये म्हणजे निर्मिक आणि निर्मिती करणारे एक “फिरते चाक” : सुभाष सोनवणे
श्रीरामपूर /बाबासाहेब चेडे : येथील वाचन संस्कृती प्रतिष्ठानचे संस्थापक, अध्यक्ष ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व साहित्य पंढरीमधील अनेक वारक-यांना घडविणारे, महाराष्ट्रातील एक किंग मेकर असणारे, श्रीरामपूर रहिवासी असलेले डॉ. बाबुराव उपाध्ये यांचा श्रीरामपूरकरांनी “श्रीरामपूर भूषण” ह्या पुरस्काराने नुकताच केलेला गौरव.
हा उचित आणि प्रेरणादायी व गौरवास्पद व स्तुत्य आहे. साहित्यिक डॉ. बाबुराव उपाध्येसर हे 1967 पासून श्रीरामपूर शहराशी निगडित आहेत. बोरावके कॉलेजला ते १९७८ पासून विद्यार्थी असतानाच गोविंदराव आदिक यांनी स्थापन केलेल्या साहित्य शिल्प च्या माध्यमातून त्यांनी साहित्य चळवळीला वाहून घेतले, त्यांची 40 पुस्तके प्रकाशित आहेत, नगराध्यक्ष अनुराधा आदिक आणि नगरपालिकेतील सर्वांनी डॉ. बाबुराव उपाध्ये यांना श्रीरामपूर भूषण पुरस्काराने गौरविले. हे सर्व तळागाळातील समाजाकरिता अतिशय प्रेरणादायीच आहे.
श्रीरामपुरातील योग्य व्यक्तिचा नगराध्यक्ष अनुराधा आदिक आणि नगरसेवकांनी नगरपालिकेच्या अमृतमहोत्सवी दिनी दखल घेऊन योग्य सन्मान केला. डॉ. उपाध्येसर यांनी पोरक्या अवस्थेत शिक्षण घेतले आहे.त्यांचे आत्मकथनपर आलेले पुस्तक ” फिरत्या चाकावरती” हे वाचतांना वाचक अनेक वेळा रडतोच. आई वडील, घरदार नातेवाईकांपासून दुरावलेल्या अनेकांच्या दारी पडेल ते काम करुन… शिक्षणाकरिता गावोगावी भ्रमंती करून पुढे ‘कमवा व शिका’. या योजनेतून त्यांनी आपले शिक्षण पूर्ण केले. त्यांची जीवन संघर्षकथा ही आजच्या युवकांना दिशादर्शक व प्रेरणादायी आहे. त्यांच्या प्रत्येक पुस्तकात प्रतिमा व प्रतिके यांचा प्रत्येय जाणवते.
ते महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांचे (पीएच डी, एम. फिल) चे गाईड होते. सध्याही सेवानिवृत्तीत निरपेक्षपणे मार्गदर्शन करीत आहेत. साहित्य प्रवाहातील एक मार्गदर्शक, वाचन संस्कृती, मानवता संवर्धनासह निसर्ग संवर्धनीय संदेश आपल्या प्रत्यक्ष कृतीतून देणारे ते एखाद्या संतासमान अवलियाच आहेत. त्यांना प्रत्यक्ष भेटल्यानंतर एक चैतन्य, आनंद व शांतीची अनुभूती येते. “प्रेम द्यावे | प्रेम घ्यावे | प्रेम पेरावे | काळजात ||” अशा ह्या ऋषितुल्य साहित्ययात्रीस शुभेच्छा व्यक्त करुन श्रीरामपूर नगरपरिषदेच्या रत्नपारखी मन, नजरेला अभिवादन करतो असे माजी पोलीस अधिकारी सुभाष सोनवणे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.ते अहमदनगर साहित्यमित्र परिवार समवेत बोलत होते.