आरोग्य

पौष्टिक गुणधर्म असलेल्या तृणधान्याचा समावेश आहारात करावा- अधिष्ठाता डॉ. रसाळ

राहुरी विद्यापीठ : तृणधान्याचे महत्व आदिकालापासून आहे. रोजच्या आहारात तृणधान्याचा समावेश पूर्वी मोठ्या प्रमाणात केला जात होता. त्याच्या पौष्टीक गुणधर्मामुळे शारिरीक कष्ट सहज साध्य होत होते. बदलत्या जीवनशैलीमुळे आपले आरोग्य बिघडले आहे. ज्वारी, बाजरी, नागली यासारख्या तृणधान्यांचे विविध वाण संशोधनामध्ये कृषि विद्यापीठाचा मोठा वाटा आहे. अशा या पौष्टीक गुणधर्म असलेल्या तृणधान्यांचा समावेश आपल्या आहारामध्ये केल्यास आपले आरोग्य अबाधित राहिल. यासाठी सर्वांनी आपल्या आहारात जास्तीत जास्त तृणधान्यांचा समावेश करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन महात्मा फुले कृषि विद्यापीठाचे अधिष्ठाता डॉ. प्रमोद रसाळ यांनी केले.

आंतरराष्ट्रीय पोषक तृणधान्य वर्ष-2023 अंतर्गत पोषण वाटीका महाभियान आणि वृक्षारोपन कार्यक्रम महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे आयोजीत करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरुन डॉ. रसाळ बोलत होते. यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणुन डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखान्याचे संचालक कृषिभूषण सुरसिंग पवार उपस्थित होते. यावेळी सहयोगी अधिष्ठाता (निकृशि) डॉ. श्रीमंत रणपिसे, हळगाव महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. मिलिंद अहिरे, कुलसचिव प्रमोद लहाळे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आंतररराष्ट्रीय पोषक तृणधान्य वर्ष-2023 बद्दल कृषि आणि किसान कल्याण केंद्रिय मंत्री मा. नरेंद्र सिंह तोमर यांनी ऑनलाईन मार्गदर्शन केले.


कृषिभूषण सुरसिंग पवार आपल्या मार्गदर्शनात म्हणाले आज आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर कमी वयात आरोग्याचे प्रश्न भेडसावत आहेत. रक्तातील साखरेचे अतिरीक्त प्रमाण व उच्च रक्तदाब या व्याधींनी मोठ्या प्रमाणात नागरीक त्रस्त आहेत. याला आपला बदललेला आहार आणि चुकिची जीवनशैली कारणीभुत आहे. कमी खर्चात अधिक उत्पादन देणारे वाण संशोधित करुन राहुरी कृषि विद्यापीठाने शेतकर्यांसाठी महत्वाचे कार्य केलेले आहे. यावेळी अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. उत्तम चव्हाण यांनी पोषक तृणधान्याचे मानवी आहारातील महत्व व राष्ट्रीय कृषि संशोधन प्रकल्पाचे प्रभारी अधिकारी डॉ. बाबासाहेब सिनारे यांनी शाश्वत शेती आणि ग्रामीण जीवनामध्ये वृक्षांचे महत्व या विषयावर उपस्थितांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी मान्यवरांच्या हस्ते वृक्षांचे वृक्षारोपन करुन उपस्थित शेतकर्यांना वृक्षांचे तसेच फुले बियाण्याचे वाटप करण्यात आले. या कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक कृषि तंत्रज्ञान माहिती केंद्राचे व्यवस्थापक डॉ. दत्तात्रय पाचारणे यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. सचिन सदाफळ यांनी तर आभार डॉ. गोकुळ वामन यांनी मानले. कार्यक्रमासाठी विद्यापीठातील सर्व विभाग प्रमुख, अधिकारी, परिसरातील शेतकरी व विद्यार्थीनी उपस्थित होते.

Related Articles

Back to top button