अहमदनगर

नगर मनमाड रस्ता दुरुस्तीसाठी “वर्षश्राद्ध आंदोलन” खा. लोखंडेंच्या मध्यस्थीने तात्पुरते स्थगित

राहुरी – नगर मनमाड रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून नगर मनमाड रस्ता दुरुस्ती कृती समितीने ३ डिसेंबर रोजी वर्षश्राद्ध आंदोलनाचा इशारा दिला होता. सदर आंदोलनाची दखल घेत शिर्डी लोकसभेचे खा. सदाशिव लोखंडे यांच्या अध्यक्षतेखाली व मा.आ.चंद्रशेखर कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत देवळाली प्रवरा नगरपालिकेत भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे अधिकारी, रस्ता वाहतूक नियंत्रक अधिकारी, पोलिस निरीक्षक, ठेकेदार कंपनी व रस्ता दुरुस्ती कृती समितीचे सदस्यांची बैठक आयोजित केली होती.

यावेळी रस्ता दुरुस्ती कृती समितीचे सदस्य देवेंद्र लांबे यांनी प्रवाशांच्या वतीने भूमिका मांडतांना सांगितले की, नगर ते शिर्डी पर्यंत रस्ता दुरुस्त व्हावा म्हणून गेल्या चार वर्षांपासून विविध आंदोलने करण्यात आलेली आहेत. आतापर्यंत राहुरी परिसरातच जवळ जवळ ४५ प्रवाशांचा अपघातात मृत्यू झाला आहे तर अनेक प्रवाशांना अपंगत्व आले आहे. या कुटुंबातील सदस्यांचे कमवत्या सदस्यांचे मृत्यू किंवा अपंगत्व आल्यामुळे कुटुंब उध्वस्त झाले आहेत. संतापून देवेंद्र लांबे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना तुम्ही किती अपघातग्रस्त कुटुंबांना भेट दिली? असा प्रश्न करत धारेवर धरले. कुटुंबांतील कमवता व्यक्ती गेल्यानंतर कुटुंबाची काय अवस्था होते हे प्रत्यक्ष जावून पहा.

३ डिसेंबर २०२२ ला रस्त्यावर दशक्रिया विधी आंदोलन केल्यानंतर राष्ट्रीय राजमार्ग कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी पत्र देत तात्काळ रस्त्याचे काम चालू केले जाईल असे सांगितले होते. परंतु एक वर्ष पूर्ण होत आले तरी प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यात आलेली नाही. अधिकारी केवळ उडवाउवीचे उत्तर देत आहेत. राहुरी येथील होणारे वर्षश्राद्ध आंदोलन हे कोणत्याही राजकीय पक्ष, नेता किंवा सरकारचे नसून राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण अधिकारी यांचे असणार आहे. कारण सरकारने निधी उपलब्ध करत त्यांचे काम केले आहे. अधिकारी त्यांच्या अधिकाराचा वापर योग्य करत नसल्यामुळे नगर शिर्डी रस्त्याचे काम थांबलेले आहे असे देवेंद्र लांबे म्हणाले.

यावेळी खा. सदाशिव लोखंडे यांनी आलेल्या अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त करत चांगलेच धारेवर धरले. निधी उपलब्ध होऊन देखील तुमच्याकडून काम होत नसेल तर आपल्या विरोधात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री ना.नितीन गडकरी यांच्याकडे तक्रार केली जाईल. रस्ता अपघाताचा प्रश्न गंभीर झालेला आहे. मी स्वतः याच रस्त्यावरून प्रवास करतो वस्तुस्थिती समोर आहे. रस्त्याला सरकारकडून निधी उपलब्ध होऊन देखील ठेकेदार वेळेत रस्त्याची कामे करत नसतील तर त्यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार तुमच्याकडे आहेत असे अधिकाऱ्यांना सुनावले. रस्त्याच्या दुरावस्था मुळे सर्वसामान्य नागरिक लोकप्रतिनिधीवर नाराज आहेत. जनतेचा लोकप्रतिनिधी या नात्याने सरकार दरबारी रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करून निधी उपलब्ध केला आहे. त्यामुळे कृती समितीची मागणी तात्काळ मान्य करावी असे खा.लोखंडे म्हणाले.

खा. लोखंडे व कृती समितीच्या सदस्यांना उत्तर देताना राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता अनिल गोरड यांनी सांगितले की, रस्ता दुरुस्तीचे काम करण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली होती. संबधित ठेकेदाराला काम चालू करण्याविषयी पत्रव्यवहार करण्यात येत आहे. परंतु आंदोलकांच्या मागणीचा विचारात घेता प्रथम प्राधान्य म्हणून विळद घाट ते सावळीविहीर पर्यंत ज्या ठिकाणी एकेरी वाहतूक आहे त्या ठिकाणी तात्काळ दुहेरी वाहतूक चालू करण्यासाठी काम चालू केले जाईल. त्यात प्रथम प्राधान्य म्हणून जोगेश्वरी आखाडा सूतगिरणीसमोर, राहुरी येथिल रस्त्याचे काम तात्काळ चालू करून दि.१० डिसेंबर पर्यंत पूर्ण करून देण्याचे आश्वासन दिले.

राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता अनिल गोरड यांनी दिलेल्या आश्वासनावर कृती समितीच्या सदस्यांनी सहमती न दाखवल्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यात मा.आ.चंद्रशेखर कदम यांनी हस्तक्षेप करत रस्ता दुरुस्ती कामासाठी खूप वर्ष वाट पहिली आहे, त्यामुळे रस्ता दुरुस्त करण्यासाठी काही वेळ ठेकेदाराला द्यावा असे मत मांडत दि.१० डिसेंबर पर्यंत मुदत देण्यासाठी आग्रही भूमिका मांडली. 

सदरील विषयावर रस्ता दुरुस्ती कृती समितीचे वसंत कदम यांनी दि.३ डिसेंबर रोजी होणारे वर्षश्राद्ध आंदोलन तात्पुरते स्थगित करत असल्याचे सांगत दि.१० डिसेंबर २०२३ पर्यंत जोगेश्वरी आखाडा परिसरातील दुहेरी रस्त्याचे काम न झाल्यास सर्व अधिकाऱ्यांचे वर्षाश्राद्धाचे फोटो असलेले फ्लेक्स बोर्ड नगर ते शिर्डी पर्यंत लावून दि.१५ डिसेंबर २०२३ रोजी अधिकाऱ्यांचे वर्षश्राद्ध आंदोलन करण्यात येईल असे वसंत कदम म्हणाले. या प्रसंगी चर्चेत शिवाजी कपाळे, गणेश भांड, संपत जाधव, अण्णासाहेब, बाळासाहेब कदम यांनी चर्चेत सहभाग नोंदविला.

या प्रसंगी राहुरीचे पो.नि. धनंजय जाधव, शिर्डीचे पो.नि. गुलाब पाटील, लोणी पो.ठाण्याचे युवराज आठरे, वाहतूक शाखेचे पो.उपनिरीक्षक बाळकृष्ण ठोंबरे उपस्थित होते. यावेळी सुनील विश्वासराव, अनिल येवले, अभिजित आहेर, गणेश रिंगे, श्रीकांत शर्मा, नितीन मोरे, सतीश घुले, संदीप कोठुळे, बाबासाहेब खांदे, मनोज कदम, प्रसाद कदम, अनोज गावडे, सुनील कराळे, सचिन कोठुळे, सचिन कदम, अमोल वाळूंज, किशोर गोसावी, अशोक तनपुरे, प्रशांत मुसमाडे आदी उपस्थित होते.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button