अहमदनगर

रस्त्याच्या कडेने जाणारा ३३ के व्ही लाईट सप्लाय धोकादायक; म्हैसगांव ग्रामपंचायतने पाडले काम बंद

राहुरी विद्यापीठ/जावेद शेख : संगमनेर तालुक्यातील खांबे या गावात नव्याने सुरू होत असलेल्या सबस्टेशन साठी राहुरी तालुक्यातील ताहाराबाद या सबस्टेशन पासून ३३ हजार के व्ही चा लाईट सप्लाय नेण्यात येत आहे. यासाठी खांबे ते ताहाराबाद सबस्टेशन पासून ११ कि.मी. पोलाची लाईन टाकण्याचे काम चालू आहे. परंतु ही लाईन अतिशय घातक व धोकादायक असल्याचे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.


हा रस्ता तीन तालुक्याला जोडणारा रस्ता असून त्यामध्ये संगमनेर, पारनेर, राहुरी यांचा सामावेश आहे. ही पूर्ण लाईनचे रस्त्याला खेटून एकदम कमी अंतर ठेवून काम केले जात आहे. भविष्यामध्ये म्हैसगाव ते राहुरी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग ४९ असल्याने त्याचे रुंदीकरण होऊ शकते. त्यावेळेस या लाईनची अडचण निर्माण होणार आहे. तसेच या रस्त्याच्या दुसऱ्या बाजूनी गावाची स्टेटलाईन गेलेली व त्याला खेटून म्हैसगांव साठीची २४ तास ची ११ हजार के व्ही ची लाईन गेली आहे. स्टेट लाईटचे कुठल्याही प्रकारचे काम करायचे असेल तर खांबे या गावी जाणारी ३३ हजार के व्ही लाईनचा सप्लाय बंद करावा लागणार आहे. कारण हा सप्लाय मोठा असल्याने त्याच्या बाजूला काम करणे शक्य होणार नाही. या रस्त्याने मोठी वाहतूक चालू असते याच रस्त्याने संगमनेर, राहुरी, संगमनेर येथील कवठे या कारखान्यांना उसाची वाहतूक केली जाते. त्यामूळे ही लाईन रस्त्यापासून दूर घेण्याची मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे. काही ग्रामस्थांनी ही लाईन संगमनेर तालुक्यातील पिंपरी खळी या गावातून आणण्यात यावी, अशीही मागणी केली जात आहे. या लाईनसाठी व चिखलठाण सबस्टेशनच्या लाईनसाठी शेतकऱ्यांची मोठी जागा जाणार आहे.

ताहाराबाद सबस्टेशनला राहुरी या ठिकाणाहून ३३ हजार केव्ही लाईन आली आहे. ही लाईन खूप जुनी झाली आहे. ताहाराबाद ठिकाणाहून चिखलठाण या ठिकाणी ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या विशेष प्रयत्नांमधून नवीन सबस्टेशन होणार आहे. या ठिकाणावरून ३३ हजार के व्ही सप्लाय जाणार आहे. काही दिवसात  खांबे, ताहाराबाद, चिखलठाण व बारागाव नांदूर या सबस्टेशनला या जुन्या तारांमुळे सप्लाई येताना अडचणी येणार व तारा तुटण्याचे प्रमाणही वाढणारा आहे, असे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. महावितरणने आमच्याकडून कुठलीही परवानगी घेतली नाही व याबाबत आम्हाला कुठलीही कल्पना नाही असे  सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सांगण्यात आले.
ही सप्लाय लाईन रस्त्यापासून दूर घेण्याचे ठेकेदाराला सांगण्यात आले होते. परंतु त्यांनी याकडे जाणूनबुजून दुर्लक्ष केले आहे व काम सुरूच ठेवले.
_ अरुण पवार
सामाजिक कार्यकर्ते

काम सुरु करण्याअगोदर ग्रामपंचायत कडून कुठलीही परवानगी घेण्यात आली नाही. ही लाईन गावाच्या  बाहेरून जावी याबाबत त्यांना लेखी ग्रामपंचायतीचे पत्र देण्यात आले आहे. तोपर्यंत काम बंद ठेवण्यात यावे.
_ सुभाष मुसळे
उपसरपंच म्हैसगांव

Related Articles

Back to top button