शिक्षणवारी ज्ञान पंढरी

मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना संगणक साक्षर बनविण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा – उंडे

देवळाली प्रवरा : इंग्रजी माध्यमाच्या शाळेत संगणकाचे धडे गिरविले जात असल्याने पालक वर्गांचा कल इंग्रजी माध्यमाकडे वाढत आहे. आपल्या शाळेत सुसज्ज अशी संगणक प्रयोगशाळा आहे. त्या संगणकाचा उपयोग करुन मराठी शाळेतील विद्यार्थ्यांना संगणक साक्षर बनविण्यासाठी शिक्षकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा पञकार राजेंद्र उंडे यांनी केले आहे.

देवळाली प्रवरा येथिल जिल्हा परीषद प्राथमिक सेमी इंग्रजी शाळेतील जेष्ठ शिक्षक सुरेंद्रकुमार जासुद यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यानिमित्त जासुद यांचा निरोप समारंभाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्या प्रसंगी पञकार उंडे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी देवळाली प्रवरा केंद्र प्रमुख निलीमा गायकवाड या होत्या तर शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष सुनिल शेटे, सदस्य अमोल भांगरे, मुख्याध्यापक मंगल पठारे, देवळाली प्रवरा केंद्रातील विविध शाळेचे मुख्याध्यापक स्वाती जोशी, मनिषा सोनवणे, वृषाली जोशी, सुवर्णा साळुंके, शुभांगी साळवे, विलास पठारे, संदिप ससाणे, शौकत पिंजारी, इमाम सय्यद आदी उपस्थित होते. सेवानिवृत्त शिक्षक सुरेंद्रकुमार जासुद यांनी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षासाठी खुर्ची भेट दिली.

पुढे बोलताना पत्रकार उंडे म्हणाले की, आज पालकांचा कल इंग्रजी माध्यमांच्या शाळेकडे वाढला आहे. परंतू वास्तविक पाहता स्पर्धा परीक्षेतून निवडी मराठी माध्यमाची मुले सर्वाधिक असतात. मराठी माध्यमाच्या मुलांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध झाल्या तर इंग्रजी माध्यमापेक्षा मराठी माध्यमाकडे विद्यार्थी संख्या वाढली जाऊ शकते. शाळेत असलेल्या संगणक प्रयोगशाळेचा उपयोग करुन शिक्षकांनी पुढाकार घेवून विद्यार्थ्यांना संगणक साक्षर बनविले तर आजच्या डिजीटल युगात मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांची प्रगती दिसेल. विद्यार्थ्यांची प्रगती दिसली तर शाळेतील प्रवेश क्षमता वाढेल. त्यासाठी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना संगणक साक्षर करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे असे आवाहन उंडे यांनी केले.

यावेळी सत्कारमुर्ती सुरेंद्रकुमार जासुद यांनी आपले मनोगत व्यक्त करताना 34 वर्ष सेवा केली. या शाळेत तीन महिन्यांपूर्वी बदलून आलो. येथे येण्यापुर्वी मला अनेक शिक्षकांनी येथिल व्यवस्थापन कमिटी बाबत भिती घातली होती. परंतू येथे हजर झाल्यावर समजले की, कानात आणि डोळ्यात चार बोटांचे अंतर असते. जे समजले होते त्यापेक्षा येथे उलटे पाहण्यास मिळाले. येथिल कमेटी उलट सहकार्याच्या भुमिकेतून काम करते. शिक्षकांच्या अडीअडचणीच्या वेळी सहकार्याची भुमिका ठेवली जाते, असे जासुद यांनी सांगितले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षपदावरुन बोलताना केंद्रप्रमुख निलीमा गायकवाड म्हणाल्या की, शाळा व्यवस्थापन समितीचे असेच सहकार्य राहणार असेल तर सहा महिन्यांत शाळेचा कायापालट झाल्याशिवाय राहणार नाही. जिल्ह्यात हि शाळा नावा रुपाला येवू शकते. शाळा व्यवस्थापन समितीने शाळेसाठी आमदार, खासदार यांच्या कडून मोठ्या प्रमाणात निधी मिळविला आहे. लवकरच डिजीटल वर्ग सुरु होणार असल्याने मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांचा प्रगती आलेख वाढणार आहे असे गायकवाड यांनी सांगितले.

यावेळी मुख्याध्यापक मंगल पठारे, सुनिता मुरकुटे, इमाम सय्यद, वृषाली जोशी, हसन शेख आदींचे भाषणे झाली. यावेळी स्वाती पालवे, सुप्रिया आंबेकर, अर्जुन तुपे, वनिता तनपुरे, सुभाष अंगारखे, मिनाश्री तुपे, लक्ष्मी ऐटाळे, शिवाजी जाधव, जकिया इनामदार आदी शिक्षक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुञसंचालन प्रफुल्ल पाटील यांनी तर आभार प्रदर्शन भारती पेरणे यांनी केले.

क्रांतीनामा टीम

"क्रांतीनामा" एक महाराष्ट्रातील चालु घडामोडी प्रसिद्ध करणारे अग्रेसर संकेतस्थळ आहे. वाचकांना राज्यातील राजकीय, सामाजिक, क्रिडा क्षेत्रातील चालू घडामोडी पुरवणे हा "क्रांतीनामा" चा मुख्य उद्देश आहे.

Related Articles

Back to top button