अहमदनगर

कोरोना शाप की वरदान यापेक्षा त्याबरोबर जगावे लागेल – प्रा मधुकर कस्तुरी

सात्रळ महाविद्यालयात राष्ट्रीय चर्चासत्र
चिंचोली/बाळकृष्ण भोसले : कोरोना काळातील अर्थव्यवस्थेवरील सकारात्मक परिणामांची चर्चा करणे गरजेचे आहे. कोरोना शाप आहे की वरदान याचे चिंतन करण्यापेक्षा त्याच्याबरोबर जगावे लागेल याचे सकारात्मक विवेचन करुन आर्थिक स्थैर्यासाठी समाजातील जाणकारांनी समाजप्रबोधन करण्याची नितांत आवश्यकता असल्याचे प्रतिपादन न्यू आर्ट्स महाविद्यालय अहमदनगर येथील ज्येष्ठ प्रा. मधुकर कस्तुरी यांनी केले.

पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सात्रळ येथील वाणिज्य आणि अर्थशास्त्र विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘कोरोना महामारीचा भारतीय अर्थव्यवस्थेवर झालेला परिणाम आणि रोजगाराच्या संधी’ याविषयीचे एक दिवशीय राज्यस्तरीय चर्चासत्र मोठ्या उत्साहात संपन्न झाले. चर्चासत्रासाठी १६५ प्राध्यापक, संशोधक विद्यार्थी, आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने सहभाग नोंदवला.

चर्चासत्राच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या श्रीमती जयश्री सिनगर होत्या. प्रास्ताविक चर्चासत्राचे संयोजक प्रा. राहुल कडू यांनी केले. उद्घाटनपर भाषण उपप्राचार्य प्रो.डॉ. सोमनाथ घोलप यांनी केले. सदर चर्चासत्रासाठीच्या प्रथम व्याख्यानमालेचे पुष्प गुंफताना ते बोलत होते.

दुसऱ्या सत्रात न्यू आर्ट्स महाविद्यालय अहमदनगर येथील प्रा. सौ. प्रतिमा जोगदंड यांनी कोरोना महामारीच्या परिणामांचे संख्यात्मक विवेचन केले. शेवटच्या सत्रासाठी पद्मश्री विखे पाटील महाविद्यालय प्रवरानगर, येथील वाणिज्य विभागप्रमुख डॉ. गोरक्षनाथ बोर्डे यांनी रोजगार संधी या विषयावर चर्चा केली. डॉ. गोरक्षनाथ बोर्डे म्हणाले, रोजगार हे निर्माण होतात आणि रोजगार मिळवण्यासाठी आपल्याकडे कोणते गुण व कौशल्य असावेत याविषयीची सविस्तर माहिती दिली.

सूत्रसंचालन प्रा. राहुल कडू यांनी केले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय चर्चासत्राचे समन्वयक प्रा. दिनकर घाणे यांनी करून दिला. आभार प्रा. हरी दिवेकर यांनी मांडले. चर्चासत्राच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. दीपक घोलप, डॉ. नितीनकुमार पाटील, प्रा. वैभव दिघे , प्रा. गोपाळे एस. डी, कार्यालयीन अधीक्षक शिंदे व्ही. बी, तांबे एम. एस. यांनी सहकार्य केले.

Related Articles

Back to top button